तलासरी : तलासरी हद्दीत कासा सायवन उधवा संजाण रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम एका ठेकेदार कंपनी कडून तसेच मुंबई अहमदाबाद महामार्ग ईभाडपाडा येथे कन्स्ट्रक्शन यांच्या मार्फत ओव्हर ब्रिजचे काम सुरु आहे. या दोन्ही कामांच्या ठिकाणी ठेकेदाराकडून कोणतीही उपाययोजना न केल्याने रस्ते अपघात होत आहेत. यात अनेकजण जखमी तसेच मृत्यू पावले आहेत.
या कामाच्या ठिकाणी ठेकेदारांनी त्वरित उपाययोजना कराव्या अन्यथा या ठिकाणी अपघात झाल्यास यास जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र तलासरी पोलिसांनी दोन्ही ठेकेदार कंपनीला दिले आहे.
तलासरी हद्दीत एका कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत तर कासा सायवन उधवा संजाण तसेच अन्य एका कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत तलासरी ईभाडपाडा येथे मुंबई अहमदाबाद महामार्ग ओव्हर ब्रिज (पूल) बांधण्यात येत आहे.
ही कामे करताना ठेकेदाराकडून कामाच्या ठिकाणी, सूचना फलक, दिशा दर्शक फलक, लाईटची व्यवस्था तसेच काहीएक उपाय योजना करण्यात आलेली दिसुन येत नाही. त्यामुळे चालकांना अपुर्ण रस्ता दिसत नसल्यामुळे ब्रेक घेतल्याने तसेच मार्गिका चुकवुन, दुस-या लाईनवर जात असताना अथवा खड्डयात टायर आपटुन टायर फुटुन मोठया प्रमाणात अपघात झालेले आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणुन रस्त्यांचे काम करताना बॅरीकेटींग, दिशा दर्शक फलक, लाईटची व्यवस्था, सुरक्षा रक्षक नेमणे तसेच रस्त्यांचे काम, बाजुला काम करताना दोरखंड वापरण्यात यावेत. या उपाययोजना त्वरित न केल्यास सदर ठिकाणी अपघात होऊन मनुष्यहानी झाल्यास व आपण सुरक्षा अनुषंगाने उपायोजना न केल्यास आपणास जबाबदार धरुन आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे पत्र पोलिसांकडून ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहे.