पालघर ः गेल्या काही दिवसांपासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी व वाहन चालक त्रस्त झालेले आहेत लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत आहेत. या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून जलसार नारंगी रो रो बोट सेवा महत्त्वपूर्ण ठरत आहे. विरार किंवा वसई तसेच नालासोपाराकडे जाणारे नागरिक महामार्गाच्या वाहतूक कोंडीतून वाट न काढता रो रो सेवेची वाट धरत आहेत. त्यामुळे इंधन व वेळेची मोठी बचत होत आहे.
दोन-तीन दिवसांपूर्वी रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्यानंतर पालघर येथे प्रवाशांचा खोळंबा झाला होता. त्यावेळीही प्रवाशांसाठी रो रो सेवा वरदायी ठरली. त्यावेळी प्रवाशांसाठी मध्यरात्रीपर्यंत ही सेवा सुरू ठेवली गेली होती. रो रो फेरी बोट सेवेने प्रवास केल्यामुळे दीड तासाचे अंतर केवळ पंधरा मिनिटात पार करता येणे शक्य आहे. त्यामुळे ही सेवा या भागासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. एका नवजात बाळाला उपचारासाठीही या रो रो सेवेने पाठवून जीवदान दिल्याची घटनाही ताजी आहे. त्यामुळे ही रो रो सेवा विरार सफाळे भागातील प्रवाशांना अतिशय सोपी व कमी वेळेची ठरत आहे.
वसई विरार पश्चिमेला जाण्यासाठी पूर्वी महामार्गाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. या भागात जायचे असेल तर किमान दीड तासाचा प्रवास महामार्गाने करावा लागत होता. सद्यस्थितीत पावसाळा, महामार्गाची दुरावस्था,विविध ठिकाणी उड्डाणपूलांचे सुरू असलेले काम अशा कारणांमुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
विरार व सफाळा परिसराला ही रो रो सेवा कमी वेळेत जोडली गेल्याने शेतकर्यांसह भाजीपाला विक्रेते, मच्छिमार महिला, रुग्ण, महिला, विद्यार्थी, नोकरदार यांना ही सेवा सोयीस्कर ठरत आहे. रस्त्याचे अंतर कमी झाल्यामुळे या सेवेला नागरिक महत्त्व देत असून दररोज मोठ्या प्रमाणात या सेवेतून प्रवास सुरू आहे. ही सेवा सुरू झाल्यामुळे दळणवळणाच्या चांगला सुविधा परिसरामध्ये निर्माण झाल्या आहेत व दळणवळण वाढल्याने या भागात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. रो रो सेवा आल्यामुळे सफाळ्यासारख्या ग्रामीण भागाचा कायापालट होईल असा विश्वास येथील नागरिक व्यक्त करत आहेत.