Vasai Virar Road Accidents pudhari photo
पालघर

Vasai Virar Road Accidents : रस्ते वाहतुकीची त्रिसूत्री ठरू शकते जीवदानाची गुरुकिल्ली

वसई-विरारमध्ये वाढत्या रस्ते अपघातांमुळे चिंता; वाहतूक शिस्तीवर भर देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : विश्वनाथ कुडू

वसई-विरार परिसरात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून निष्पाप नागरिकांना अकाली जीव गमवावा लागत आहे. वाढत्या अपघातांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासन, परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे प्रभावी उपाययोजना केल्यास अनेक संभाव्य जीवघेणे अपघात टाळता येऊ शकतात, असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

विशेषतः ‘३०-५०-८०’ या वेगमर्यादा त्रिसूत्रीचा प्रचार आणि काटेकोर अंमलबजावणी केल्यास अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. या संकल्पनेनुसार शहरे, गावे, शाळा परिसर, नाके आणि गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी वाहनांचा वेग ताशी ३० किलोमीटर, इतर अंतर्गत रस्त्यांवर ताशी ५० किलोमीटर आणि महामार्गांवर ताशी ८० किलोमीटर मर्यादित ठेवण्याची शिफारस करण्यात येत आहे.

वसई-विरारमधील अलीकडील अनेक प्राणघातक अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचा मोठ्या प्रमाणात बळी गेला आहे. समोरून येणाऱ्या भरधाव व बेदरकार वाहनांच्या धडकेत अनेकांना जीव गमवावा लागला. हेल्मेटचा वापर न करणे, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष आणि अतिवेग ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे.

तज्ज्ञांच्या मते, केवळ वाहनचालकांनीच नव्हे तर पादचारी, शाळकरी मुले आणि पालकांनीही वाहतूक शिस्त पाळणे आवश्यक आहे. रस्ता ओलांडताना किंवा रस्त्यालगत चालताना खबरदारी घेणे, तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये वाहतूक सुरक्षेचे नियमित प्रशिक्षण देणे काळाची गरज बनली आहे.

वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई, वेगमर्यादांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा सक्तीने वापर आणि ‘३०-५०-८०’ त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी झाली तर अनेक कुटुंबांचे आधारस्तंभ वाचू शकतील, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. रस्ते सुरक्षित झाले तरच जीवितहानी कमी होईल आणि ‘सुरक्षित प्रवास’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरेल.प्रत्येक वाहनचालकाने वाहतुकीचे नियम पाळून सुखरूप प्रवासा करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT