पड रे पाण्या, पड रे पाण्या, कर पाणी पाणी शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी. या कविवर्य र. वा. दिघे यांच्या वास्तववादी कवितेची प्रकर्षाने प्रचिती मोखाडा तालुक्यातील शेतकरी घेत आहेत.अगोदर धो धो कोसळून ऐन लावणीच्या भर मोसमातच पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे.
मोखाडा तालुक्यात पावसाने प्रदीर्घ दांडी मारली आहे. त्यामुळे नागली, वरई आणि हळवी भात पिकांची आवणी खोळंबल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे. आत्ता लगेचच सलग पाऊस झाला नाही तर उभी पिके हातची जाणार असल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा तालुक्यातील शेतकरी हे हंगामी शेती आणि वरच्या पाण्यावर अवलंबून असतात तालुक्यात कुठेही शेतीलायक सिंचन सुविधा नाही त्यामुळे पावसाने कृपा केली तरच शेतकर्यांची उपजीविका चालते मात्र यंदा पावसाचा सततचा प्रदीर्घ खोळंबा शेतकर्यांच्या अक्षरशः मुळावर उठल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
तालुक्यात कुठेही लावणी लायक पाऊस न पडल्याने सर्वत्र लावणीचे कामे खोळंबली आहेत. मुसळधार पाऊस असल्याशिवाय येथील लावणी होत नाही. त्यामूळे नागली आणि हळवी भातपिके पोटरीत येवूनही शेतकर्यांना लावणीची कामे मार्गी लावता येत नाही. त्यामुळे नागली व भाता सारखी उपजीविकेचे पिकेच हातातुन जातात की काय? अशी विवंचना शेतकर्यांना भेडसावत आहे. त्यामुळे येथील शेतकरी हतबल झालेला दिसत आहे.
पै पै जमवून शेती करीत असतो.अर्धी आवणी उरकली तर अर्धे मुठ शेतातच बांधून ठेवले असतांनाच पावसानेही पाठ फिरवल्याने आम्ही आत्ता कोणाच्या तोंडाकडे पहायचे..?चंद्रकांत रघूनाथ झोले, शेतकरी, खोडाळा.
अगोदर धो धो कोसळला त्यामुळे पिकांची वाढ खुंटली, आत्ता पिके फोफावली असून आवण्याजोगती झालेली आहेत. तर पावसाने पाठ फिरवली आहे. नागली आणि भातासाठी भरपुर आणि संततधार पाऊस असल्याशिवाय लावणी करता येत नाही. शेत निखळ कोरडीठाक पडली आहेत. अशा परिस्थितीत आम्ही लावणी कशी करायची?कोंडाजी ठोमरे, शेतकरी, जोगलवाडी