पालघर : नोव्हेंबर महिना उजाडला तरीही अवकाळी पाऊस सुरु असल्यामुळे रब्बी हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. खरीप हंगामातील भात शेतीचे मोठे नुकसान झाले असताना अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामा वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पालघर जिल्ह्यातील रब्बी हंगामातील सरासरी लागवड क्षेत्र ४५०० हेक्टर असुन रब्बी पिकांमध्ये हरभरा, वाल, मटकी, कुळीथ, मटकी आणि तीळ लागवड केली जाते.
रब्बी हंगामातील लागवडीसाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप तसेच लागवड प्रात्यक्षिकांमुळे लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा पिकाची लागवड केली जाते. इतर पिकांमध्ये वाल, मटकी, कुळीथ, तीळाची लागवड केली जाते. भाजीपाला लगावडीचे क्षेत्र ४५०० हेक्टर असून मिरची, तसेच वेल वर्गीय पिकांमध्ये कारले, दोडका, काकडी, कारले आणि दुधीची लागवड केली जाते. रब्बी पिकांच्या लागवडीमध्ये पालघर जिल्ह्यात हरभऱ्याची पेरणी सुमारे एक हजार ९२० हेक्टर क्षेत्रात पेरणी केली जाते. हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १३५० हेक्टर आहे. इतर कडधान्याच्या लागवडीमध्ये वाल, मटकी, कुळीथ लागवडीचे सरासरी क्षेत्र दोन हजार ८०० हेक्टर आहे. पालघर जिल्ह्यातील पाच तालुक्यात काळ्या तीळाची लागवड केली जाते.
काळ्या तीळाच्या लागवडीचे क्षेत्र ६४४ हेक्टर आहे. पाच तालुक्यापैकी पालघर तालुक्यात सर्वाधिक ३८५ हेक्टर क्षेत्रात तर विक्रमगड तालुक्यात १४० हेक्टर क्षेत्रात तीळाची लागवड केली जाते. तेलबिया लागवडी अंतर्गत सूर्यफूलाची लागवड करण्यात येते. यंदाच्या रब्बी हंगामात वाडा तालुक्यात ५० हेक्टर क्षेत्रात सूर्यफूलाची लागवड केली जाते. जिल्ह्यात भाजीपाला लगावडीचे क्षेत्र ४५०० हेक्टर पर्यंत आहे. प्रामुख्याने मिरची, दोडका, काकडी, कारले आणि दुधीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि सद्य स्थितीत सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नोव्हेंबर महिना उजडला तरीही अवकाळी पाऊस सुरु आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्या लांबल्या आहेत. अवकाळी पाऊस सुरु राहिल्यास रब्बी हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे.विकास पाटील, शेतकरी, कुडे.
अवकाळी पावसामुळे भात पिकाचे नुकसान झाले असताना नोव्हेंबर उजाडल्या नंतरही पाऊस सुरु असल्यामुळे रब्बी हंगामातील पेरण्या लांबल्या आहेत. पाऊस सुरूच राहिल्यास रब्बी हंगाम वाया जाण्याच्या शक्यतेने बळीराजा हवालदिल झाला आहे.