बोईसर : नागझरी-किराट आणि किराट-चिंचारे या रस्त्यांचे अवघ्या काही दिवसांपूर्वीच पूर्ण झालेले डांबरीकरण पहिल्याच पावसात निकृष्ट ठरले. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या तक्रारींनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने डागडुजीला सुरुवात केली असली, तरी ही डागडुजीदेखील अत्यंत हलक्या दर्जाची असून, केवळ औपचारिकता म्हणून केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
खड्ड्यांमध्ये डांबराऐवजी फक्त खडी व पावडर पसरवून काम उरकले जात आहे. कोणतेही योग्य नियोजन किंवा दर्जेदार साहित्य न वापरता दिखाव्यापूर्ती मलमपट्टी केल्यामुळे दोनच दिवसांत ही डागडुजीही निष्फळ ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या कामात डांबराचा वापरच न केल्याने खड्डे पूर्ववत दिसून येत आहेत.
11 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या या रस्त्यांचे निकृष्ट काम व त्यानंतर चाललेली ढिसाळ डागडुजी यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याआधीही या रस्त्यांबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. माध्यमांतूनही आवाज उठवण्यात आला होता. मात्र संबंधित अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज रस्त्यांची ही अवस्था झाली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सध्या केवळ खड्डे बुजवण्याचे नाटक सुरु असून, डागडुजीचे हे काम दर्जेदार होईपर्यंत नागरिक शांत बसणार नाहीत, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.