विरार: मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांविरोधात सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असून अवघ्या 22 दिवसांत तब्बल 1 कोटी 90 लाख रुपयांहून अधिक किमतीचे विविध अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. वाढत्या अमली पदार्थांच्या विक्री आणि सेवनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही व्यापक मोहीम हाती घेतली होती. या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेते आणि तस्करांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
परिमंडळ 1, 2 आणि 3, अंमली पदार्थ विरोधी कक्ष तसेच गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी संयुक्तरित्या ही मोहीम राबवली. पोलिसांनी विविध भागांमध्ये गुप्त माहितीच्या आधारे सापळे रचून छापे टाकले. या कारवाईदरम्यान गांजा, मेफेड्रोन, कोकेन, ब्राऊन शुगर, चरस यांसारख्या घातक अंमली पदार्थांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची बाजारातील किंमत तब्बल 1 कोटी 90 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी 57 आरोपींना अटक केली असून त्यामध्ये 39 पुरुष, 6 महिला तसेच काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.
तपासादरम्यान या अंमली पदार्थांच्या जाळ्यात बांगलादेशी आणि नायजेरियन नागरिक सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. शहर आणि उपनगरांमध्ये तरुणांना लक्ष्य करून अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू केला आहे.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी उघडपणे गांजाचे सेवन करणाऱ्या तब्बल 422 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रेल्वे स्थानके, मोकळी मैदाने, गल्लीबोळ तसेच काही निर्जन भागांमध्ये अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अचानक धाडसत्र सुरू करत संबंधितांवर कठोर कारवाई केली. त्यामुळे अनेक ठिकाणी अंमली पदार्थांचे खुलेआम सेवन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच विविध भागांमध्ये संशयास्पद हालचाली करणाऱ्या 212 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
काही आरोपी हे अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी तरुणांचा वापर करत असल्याची माहितीही तपासातून पुढे आली आहे. पोलिसांनी या संपूर्ण रॅकेटची मुळे शोधण्यास सुरुवात केली असून पुरवठादार आणि मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी तपास अधिक वेगाने सुरू आहे.
ही संपूर्ण मोहीम पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विविध पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी कक्ष आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. पोलिसांनी तांत्रिक माहिती, गुप्त सूत्रे आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने अनेक ठिकाणी एकाचवेळी कारवाया केल्या.
अंमली पदार्थांचे वाढते प्रमाण ही समाजासाठी गंभीर आणि धोकादायक बाब असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. विशेषतः युवक आणि अल्पवयीन मुलांना या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली जात असल्याचे सांगण्यात आले. शाळा, महाविद्यालय परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जात असून आगामी काळात ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन
शेवटी पोलिसांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, आपल्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा सेवन होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. समाजातील तरुण पिढीला या घातक विळख्यातून वाचवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही पोलिसांनी नमूद केले.