विक्रमगड : गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर यंदाची पोलिसांची दिवाळी निवडणुकीच्या बंदोबस्तात आणि धावपळीत जाणार आहे. पोलिसांच्या रजा, सुट्या २५ नोव्हेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या कुटुंबीयांना कुटुंबप्रमुखाशिवाय सण साजरा करावा लागणार असे चित्र दिसते. विशेष म्हणजे जिल्ह्याबाहेरील बहुतांश पोलिस अधिकारी पालघर जिल्ह्यात सेवा देत आहेत.
लोकसभा निवडणुकीत जवळपास दोन महिने पोलिस बंदोबस्तात व्यस्त होते. त्यानंतर थोड्या दिवसाची विश्रांती मिळाली. पुन्हा गणेशोत्सवात पोलिस यंत्रणा बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर नवरात्रोत्सवाचा बंदोबस्तही झाला. विधानसभा निवडणुकीची लगबग ऐन दिवाळीत सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार यंदाच्या दिवाळीतच निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे.
निवडणूक म्हटली की, उमेदवारांच्या अर्ज भरण्यापासून ते निकालापर्यंत पोलिसांना दक्ष राहावे लागते. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांना रात्रंदिवस सज्ज राहावे लागते. यंदा तर दिवाळी सणाचा बंदोबस्त आणि निवडणूक दोन्हींकडे पोलिस यंत्रणेला लक्ष द्यावे लागणार आहे. निवडणुका म्हटले की, पोलिसांच्या रजा आणि सुट्या बंद होतात. त्यानुसार यंदाही पोलिसांना सणासुदीच्या काळात कुटुंबीयांकडे दुर्लक्ष होणार आहे.