सचिन भोईर
विक्रमगड: एकीकडे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासन आणि नागरिकांकडून जलसंवर्धनाचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे पिंजाळ नदीवरील पाली येथील बंधाऱ्याला मोठे भगदाड पडल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाहून जात आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या दोन वर्षांपूर्वी या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल ३० ते ४० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पुन्हा बंधाऱ्याला अनेक ठिकाणी भगदाड पडल्याने रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
सध्या सर्वत्र दुष्काळाचे सावट असून आगामी काळात पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात शासनाच्या माध्यमातून विविध ठिकाणी वनराई बंधारे उभारण्याचे काम सुरू आहे.
अनेक ठिकाणी नागरिकही लोकसहभागातून पाणी अडविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मात्र पिंजाळ नदीवरील पाली बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असल्याने जलसंधारणाच्या प्रयत्नांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बंधाऱ्याला अनेक ठिकाणी पडलेल्या भगदाडातून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर पडत असून साठवलेले पाणी वेगाने वाहून जात आहे. ही पडलेली भगदाडे तातडीने बुजविण्यात आली नाही, तर जानेवारी महिन्यापर्यंत बंधाऱ्यातील पाणीसाठा पूर्णपणे संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा फटका वाडा आणि विक्रमगड तालुक्यांतील अनेक गाव-पाड्यांना बसण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच या भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
दोन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आलेल्या बंधाऱ्याची पुन्हा अशी अवस्था कशी झाली, असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधित कामाचा दर्जा, वापरण्यात आलेले साहित्य आणि कामाची गुणवत्ता यांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
एकीकडे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे लाखो रुपये खर्चून बांधलेल्या बंधाऱ्यातून पाणी वाहून जात असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून बांधऱ्याच्या भिंतीला पडलेली भगदाडे बुजवावीत आणि पाण्याची गळती थांबवावी त्याच बरोबर झालेल्या दुरुस्तीच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
पाली येथील बंधऱ्याला अनेक ठिकाणी पडलेल्या भागदाडामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असून यावर उपाययोजना न केल्यास लवकरच हा बंधारा खाली होईल आणि मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे शासनाने तात्काळ लक्ष देऊन या बंधाऱ्याला लागलेली गळती बंद करावी.- मयूर भागडे, ग्रामस्थ, काशिवली