तलासरी : पालघर जिल्हा परिषदेकडून सन २०१७- १८ या शैक्षणिक वर्षात प्राथमिक वर्गाना जोडून नव्याने सुरु केलेल्या इयत्ता ९ वी व १० वी च्या वर्गासाठी तात्पुरत्या स्वरुपात इंग्रजी, गणित, आणि विज्ञान या विषय शिक्षकांची प्रशासनाने शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता निकष तपासून कंत्राटी पद्धतीवर शिक्षकांची नेमणूक केलेली आहे.
दरवर्षी याच शिक्षकांना नेमणूक दिली जाते. हे विषय शिक्षक प्रामाणिकपणे अध्यापनाचे काम करतात. मात्र या शिक्षकांना शैक्षणिक वर्ष २०२५- २६ सुरु होऊन आज तब्बल आठ महिने उलटूनही अद्याप या शिक्षकांना प्रतिमहा मिळणारे आठ हजार रुपये मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
प्रतिमाह आठ हजार रुपये मिळणारे तटपुंज मानधन ही वेळेवर मिळत नाही. जिल्हा परिषद पालघर अंतर्गत कंत्राटी शिक्षक १ ते ८ वी च्या वर्गाना शिकवणाऱ्या शिक्षकांना २० हजार मानधन व पेसा शिक्षक १६ हजार मानधन दिले जाते. आणि गेल्या आठ वर्षापासून माध्यमिक वर्गासाठी प्रामाणिकपणे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना फक्त ८ हजार रुपये एवढे तटपुंज मानधन दिले जाते. तसेच गेल्या ८ वर्षांपासून या विषय शिक्षकांच्या मानधन मध्ये कोणतीच वाढीव केलेली नाही असा प्रकारचा एक अन्याय प्रशासन या शिक्षकांवर करत असल्याचे दिसून येते. इयत्ता १ ली ते ८ वी पर्यत शिकवणाऱ्या शिक्षकापेक्षा माध्यमिक विषय शिक्षकांना अधिक कामाचा ताण आहे?
विद्यार्थी पटसंख्या टिकवून ठेवणे, इयत्ता १० वी चा १०० टक्के निकाल च्या दृष्टीने अध्यापन करने, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण करून घेणे, इयत्ता १० वी फॉर्म भरणे, साहित्य.. बोर्ड वाशी येथे जमा करणे व आणणे., सराव परीक्षा घेणे, सुपरविजन व पेपर तपासणे ई. अनेक कामे हे विषय शिक्षक प्रामाणिकपणे पार पाडत आहेत तरीसुद्धा जिल्हा परिषद पालघर या इयत्ता ९ वी व १० वी विद्यार्थी व शिक्षकाकडे दुर्लक्ष का करते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वाढत्या महागाईच्या काळात ८ हजार प्रती महिना प्रमाणे हे शिक्षक कुटुंब कसे सांभाळणार ? यामुळे अनेक शिक्षकांचे आर्थिक अडचणीमुळे अंतोनात हाल होत आहे. शिक्षक उपाशी मात्र इयत्ता १० वी चा निकाल अधिकारी वर्गाना १०० टक्के हवा असतो. हेच अधिकारी या शिक्षकांना मानधन मिळाले कि नाही याचा पाठपुरावा सुद्धा करत नाहीत असा आरोप करीत असून अधिकारी वर्गाकडून फक्त आश्वासने दिले जात असल्याचे शिक्षकांनी सांगितले.