पालघर ः नविद शेख
दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर शाळेच्या पहिल्या दिवशी पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील वेढे फरारपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी पोहोचले पण शिक्षकच गैरहजर असल्याचे चित्र होते.
विना शिक्षकी शाळा सुरु असल्याचे पाहून वेढे ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी गटविकास अधिकारी आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर दुपारी दोन वाजता एक कंत्राटी शिक्षक शाळेत हजर झाले. आदिवासी बहुल विद्यार्थ्यांची 67 पट संख्या असलेल्या शाळेत दोन शिक्षकांची पदे मंजूर असताना शिक्षण विभागाकडून एक कंत्राटी शिक्षकाची नेमणूक करण्यात आल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कारभारा विरोधात सरपंच राजेश फरारा यांनी आक्रमक भूमिका घेत शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
विक्रमगड तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम भाग असलेल्या वेढे ग्रामपंचायत हद्दीतील फरारपाडा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची पट संख्या 67 आहे. आदिवासी बहुल विद्यार्थी असलेल्या फरार पाडा शाळेत असून दोन शिक्षकांची पदे मंजूर आहेत. दिवाळीच्या सुट्टी दरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. या बदल्यांच्या प्रक्रियेत फरार पाडा शाळेत नियुक्त असलेल्या दोन्ही शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.
दोन्ही शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे शाळा शून्य शिक्षकी ठरली आहे.दिवाळीची सुट्ट्या संपल्यानंतर सोमवार शाळा सुरु झाल्या.विद्यार्थी वेळेत शाळेत पोहोचले परंतु शिक्षक गायब असल्यामुळे विद्यार्थी शाळा परिसरात शिक्षकांच्या प्रतीक्षेत होते. विद्यार्थी वर्गा बाहेर असल्याचे वेढे ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश फरारा यांच्या निदर्शनास आल्यानंतर शाळेत जाऊन पाहणी केली असता शिक्षक नसल्याची माहिती विदयार्थ्यांनी दिली.
सरपंच राजेश फरारा यांनी शिक्षक नसल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवा सांबरे यांना तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिली.बेजबाबदार कारभारा विरोधात शिक्षण विभागात अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने दुपारी दोन पेसा अंतर्गत कंत्राटी तत्वावरील शिक्षक शाळेत हजर झाले.दोन शिक्षकांच्या बदली नंतर फरार पाडा जिल्हा परिषद शाळेत पेसा अंतर्गत कंत्राटी शिक्षकाची तात्पुरती नियुक्ती केल्याने शिक्षण विभागाच्या कारभारा विरोधात संतापाचे वातावरण आहे.
आंतर जिल्हा बदलीतील शिक्षकांच्या बदल्यांमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवा सांबरे यांनी केला आहे.आंतर जिल्हा बदलीस पात्र शिक्षकांना कार्यमुक्त करण्यास विरोध केला होता.बदल्यांमुळे जिल्ह्यातील काही शाळा एक शिक्षकी तर अनेक शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत.
शिक्षण विभागाच्या बेजबाबदार कार्यपद्धती मुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.नुकसानीला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा कारभार जबाबदार आहे.आंतरजिल्हा आणि ऑनलाईन बदल्यांमुळे जिल्ह्यात शिक्षकांची संख्या घटल्यामुळे शिक्षण विभागाचे नियोजन कोलमडल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
शिक्षक बदल्यांमधील गैरव्यवहाराबाबत आपल्याला काही माहिती नसून, कोणतीही शाळा शून्यशिक्षकी होणार नाही याची आम्ही खबरदारी घेतली आहे. न्यायालयाच्या आदेशाने शिक्षकांना कार्यमुक्त केले आहे.सोनाली मातेकर, जिल्हा शिक्षणाधिकारी.