Palghar New
पालघर : परदेशात गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून युरोप गाठलेल्या पालघरमधील एका तरुणाची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उमेश किसन धोडी असे या तरुणाचे नाव असून, तो सध्या युरोपमधील अल्बानिया देशात अडकला आहे. एजंटने नोकरीच्या नावाखाली फसवून आपल्याला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत, त्याने मनसेचे पदाधिकारी तुलसी जोशी यांना व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधून मदतीसाठी विनवणी केली आहे. या व्हिडीओमध्ये तो ढसाढसा रडत असून, "मला वाचवा, मला देशात परत यायचं आहे," अशी कळकळीची विनंती करत आहे.
पालघरमधील बच्चू मिया चाळ येथे राहणाऱ्या उमेश धोडी याला गुजरातमधील वडोदरा येथील 'आयओआर' (IOR) कंपनीचा एजंट रफिक घाची याने युरोपमध्ये चांगल्या नोकरीचे आमिष दाखवले. त्यानुसार, त्याला युरोपमधील अल्बानिया या देशात 'अमेक सोल्युलर ग्रुप' नावाच्या कंपनीत नोकरी लावण्यात आली. मात्र, तिथे पोहोचल्यावर कंपनीकडून करारात नमूद केलेल्या कोणत्याही सुविधा, विशेषतः मेडिकल इन्शुरन्स, मिळत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. याबाबत जाब विचारला असता, कंपनीने त्याच्यावरच खोटे आरोप लावून त्याला तडकाफडकी कामावरून काढून टाकले.
एजंट आणि कंपनी दोघांकडूनही फसवणूक झाल्याने उमेश युरोपमध्ये एकटा पडला आहे. त्याने व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली. तो म्हणतो, "एका एजंटने मला युरोपमध्ये आणून फसवलं. त्याने कोणतीही मदत केली नाही. एवढ्या मोठ्या कंपनीत आमचा मेडिकल इन्शुरन्स का काढला नाही, असं मी विचारल्यावर त्यांनी माझ्यावरच खोटे आरोप लावून मला कामावरून काढून टाकलं. माझी मदत करा."
उमेशला स्थानिक एजंटकडून धमक्याही मिळत आहेत. त्याने मनसेचे तुलसी जोशी यांना केलेल्या व्हिडीओ कॉलमध्ये म्हटले आहे की, "मी प्रामाणिकपणे काम करत होतो, तरीही मला नोकरीवरून काढण्यात आले. माझा इथे मानसिक छळ केला जात आहे. स्थानिक एजंट मला गायब करण्याच्या धमक्या देत आहेत. इथे मला कोणाचीही मदत मिळत नाहीये. पुढे काय करावं, हेच कळत नाहीये. मला काहीही करून मदत करा, मला माझ्या देशात परत यायचं आहे."
या प्रकारामुळे परदेशात नोकरीच्या शोधात जाणाऱ्या तरुणांना योग्य माहिती आणि खात्रीशीर एजंटची निवड करण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. उमेशच्या मदतीसाठी प्रशासन आणि परराष्ट्र मंत्रालयाने त्वरित लक्ष घालण्याची गरज आहे.