पालघर : विरोधकांनी कितीही डाव रचला तरी काँग्रेसमुक्त भारत व काँग्रेसमुक्त पालघर होणे शक्य नाही. कारण काँग्रेस ही जनमानसात आहे. सध्याला काँग्रेसची स्थिती योग्य नसली तरी काँग्रेसचे निष्ठावंत व हाडाचे कार्यकर्ते यांच्यामुळे आजही पक्ष टिकून आहे. त्यामुळे येत्या काळात पालघर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला चांगले दिवस येतील, असे मत काँग्रेसच्या पालघर जिल्ह्याचे प्रभारी निरीक्षक विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केले.
पालघर जिल्ह्याची पक्ष बांधणी व पक्षाची संघटनात्मक सद्यस्थिती याचा आढावा घेऊन त्याचा अहवाल राज्याचे प्रदे- शाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे देणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. येत्या काळात पक्ष वाढीच्या दृष्टिकोनातून चांगले बदल दिसून येतील असेही त्यांनी सुतोवाच केले.
निरीक्षक विक्रांत चव्हाण यांनी तालुका निहाय तलासरी, डहाणू, पालघर, वसई अशा तालुक्यांचा दौरा करून पक्षाची व सामाजिक स्थिती जाणून घेतली. तर येत्या काळात वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या तालुक्यात दौरे करून ते ही स्थिती जाणून घेणार आहेत. पक्षामधून कोण सोडून गेले याला फारसे महत्व न देता काँग्रेसच्या विचारसरणीचे सदस्य जोडून पक्ष वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या आढाव्या संदर्भात त्यांनी पालघर काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रभारी यशवंत सिंग ठाकूर, महिला पदाधिकारी संगीता धोंडे, काँग्रेसचे पदाधिकारी सिकंदर शेख, मनीष गणोरे, अविश राऊत, तालुकाप्रमुख राजेश अधिकारी, रोशन पाटील, युवा पदाधिकारी कॅप्टन सत्यम ठाकूर आदी उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यात जिल्ह्यात तारापूर औद्योगिक वसाहत, भाभा अणुशक्ती केंद्र याच सोबत इतर महत्त्वपूर्ण प्रकल्प आहेत. जिल्ह्यामध्ये केवळ रस्त्यांचा विकास झाला असून इतर प्रकारचा विकास आजही भकासच आहे, असे स्पष्ट मत चव्हाण यांनी मांडले. झोपडपट्टी पुनर्वसन, आदिवासी समाजाचा विकास, महिला सुरक्षा, महिला तरुणांना रोजगार, शैक्षणिक विकास यासह औद्योगिक धोरण आखण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे त्यांनी येथे सांगितले. हा विकास शाश्वत्व व एकसंघरित्या होणे आवश्यक आहे. मात्र पालघर जिल्ह्यात तसे झालेले नाही.
गेल्या दोन-तीन दशकांमध्ये राज्यात विविध नेतृत्व तयार झाली. मात्र नेतृत्व व स्थानिकांचे प्रश्न, त्यांचा विकास या विषयांवर सांगड घातली गेलेली नाही. एकसंघता ठेवून हा विकास होणे गरजेचे असल्याचे चव्हाण यांनी आपले मत बोलताना व्यक्त केले. पालघर जिल्ह्याला प्रतिनिधित्व देण्याचं काम काँग्रेसने केले आहे. त्यावेळेला काँग्रेसने जिल्ह्याचे विभाजन केले. त्यामुळे आता भाजपाला येथे सत्ता उपभोगता येत आहे, असा टोला चव्हाण यांनी लगावला.
पालघर हा निसर्ग समृद्ध जिल्हा आहे. स्थानिक पातळीवर रोजगार, शिक्षणात धोरणाची आवश्यकता, मच्छीमार, शेतकरी, बागायतदार अशा विविध घटकांचा विकास आवश्यक आहे. येत्या काळात पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन काँग्रेस त्या सोडवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करेल व नागरिकाच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरेल अशी ग्वाही देत असल्याचे निरीक्षक चव्हाण यांनी येथे सांगितले. पालघर हा महत्त्वपूर्ण जिल्हा असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी येथे लक्ष केंद्रित केले आहे. मात्र पालघरच्या स्थापनेत काँग्रेसचा मोठा वाटा आहे. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडीमध्ये सुसंवाद साधत काँग्रेसच्या जिल्हा पक्ष बळकटीकरणासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न राहतील व काँग्रेस येथे आपली ओळख पुन्हा मिळवेल, असे चव्हाण म्हणाले.