Palghar water crisis 
पालघर

Palghar water crisis | जून अर्धा उलटत आला तरी वरुणराजाचा मागमूस नाही : पाणीटंचाई लांबली

अपुर्ण नळयोजनांमुळे टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या वाढली. संख्या 40 वर

पुढारी वृत्तसेवा

दीपक गायकवाड

खोडाळाः पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आणि वाडा या तालुक्यात यावर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच यंदा पावसाळा लांबल्याने ही पाणीटंचाई अधिकच लांबली आहे. ऊन्हाच्या तडाख्याने आणि अपुर्ण नळयोजनांमुळे, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मोखाड्यात टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्याही वाढली आहे. सद्यस्थितीत मोखाडा तालुक्यात शासनाकडून 11. टॅकरद्वारे 40. गावपाड्यांना पाणी पुरवठा करून येथील नागरीकांची तहान भागवली जात आहे.

प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. जलजीवन मिशन योजनेमुळे पाणी टंचाई ला आळा बसेल असा दिलासा, टंचाईग्रस्त गावपाड्यांना होता. मात्र, तालुक्यात अनेक नळयोजनांची कामे अपुर्णावस्थेत असल्याने, त्याचा फटका यंदाही टंचाईग्रस्त गावपाड्यांना बसला आहे. निधी अभावी नळयोजनांची कामे रखडल्याचे, प्रशासन आणि कंत्राटदार संघटनेकडून सांगण्यात येत आहे. निधी मिळावी म्हणून पालघर जिल्हा कंत्राटदार संघटनेने अनेकदा आंदोलन देखील केली आहेत. मात्र, जलजीवन मिशन योजनेसाठी निधी उपलब्ध न झाल्याने, जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अनेक नळपाणी पुरवठा योजना अर्धवट अवस्थेत आहेत.

त्याचा फटका मोखाडा तालुक्यालाही बसला आहे. तालुक्यात 55 पैकी 29 नळपाणी पुरवठा पुर्ण झाल्याचा सरकारी अहवाल कागदावर आहे. प्रत्यक्षात नागरीकांच्या घरात पाणीच पोहोचलेले नाही. त्यामुळे पाणीटंचाई ची सर्वाधिक झळ मोखाडा तालुक्याला बसली आहे. नळपाणी पुरवठा योजना अपुर्णावस्थेत असल्याने, मोखाड्यात 40 टंचाईग्रस्त गावपाड्यांना 11 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

रणरणत्या ऊन्हामुळे टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्याही वाढत आहे. तालुक्यातील पिंपळपाडा आणि चोंडीपाडा यांनी ही टॅकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी पंचायत समिती प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या चाळीशी पार झाली आहे. ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता पाणी पुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.

मागील वर्षी 9 जुन ला मोखाड्यात टंचाईग्रस्त गावपाड्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी टॅकरची चाके नियमित पावसाळा सुरू झाल्याने, स्थिरावली होती. यंदा १५ जून ऊजाडला तरी, पावसाचा कुठलाही मागमुस नसल्याने पाणीटंचाईची तिव्रता मोखाड्यात कायम आहे. ऊन्हाच्या काहीलीने, त्रस्त महिलांना आजही टॅकर ने विहीरीत टाकलेले पाणी डोक्यावर हंडा घेऊन घरी आणावे लागत आहे. जलजीवन मिशन योजनेच्या धोरणानुसार तालुक्यातील महिलेच्या डोक्यावरील हंडा खाली उतरलाच नाही.

सद्यस्थितीत टॅकरद्वारे पाणी पुरवठ्याने 14091 तर 3901 पशुधन अशी एकूण 17 हजार 992 जणांची तहान भागवली जात आहे.

मागील टंचाई हंगामात तुलनेने टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या वाढली...

मोखाड्यात गतसाली. 12 टॅकरद्वारे. 34 गावपाड्यांना पाणी पुरवठा करण्यात आला होता. तर 9 जून ला पाणीटंचाई संपुष्टात आली होती. यंदा पावसाने ओढ दिल्याने आणि रखरखीत ऊन्हामुळे टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या 40. ची पार झाली आहे. त्यांची तहान तारेवरची कसरत करत 11 टॅकरद्वारे प्रशासनाला भागवावी लागत आहे. तसेच अजूनही टंचाईग्रस्त गावपाडे वाढत आहेत. 14 जून नंतरही तालुक्यात पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे तालुक्यातील आदिवासी पाणीटंचाई ने होरपळे आहेत.

मोखाड्यातील टॅकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणारी गावपाडे...

धामोडी, गोळीचापाडा, डोंगरवाडी, हेदवाडी, जांभुळवाडी, बादलपाडा, हुंड्याचीवाडी, वडपाडा, बिवलपाडा, धामणी, कुडवा, मोरेश्वरपाडा, धनगरेवाडी, घानवळ, फणसपाडा, सोनारवाडी, मोहपाडा, हनुमान टेकडी, भोसपाडा, आमले, पाटीलपाडा, मोरद्याचापाडा, शेड्याचीमेट यांसह 40. गावपाड्यांना टॅकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT