वाडा : वाडा तालुक्यातील कोने गावातील एका महिलेची अज्ञात आरोपींनी निर्घृण हत्या केली असून हत्येच्या 10 दिवसानंतरही आरोपी मात्र मोकाट फिरत आहेत. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचे बोलले जात असून वाडा तालुक्यातील हत्यांचे सत्र काही केल्या संपायला तयार नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार कोने गावातील संगीता पाटील, वय 70 ही महिला 11 सप्टेंबरला अचानक घरातून निघून गेली मात्र यावेळी घरात कुणीही नसल्याने व त्यांनी कुणाला याबाबत माहिती न दिल्याने त्यांचा सर्वत्र शोधाशोध सुरू होता. संगीता या शेतावर अधूनमधून जात असून बाहेरगावी राहणारा मुलगा व मुलीकडे त्या गेल्या असाव्यात असा कुटुंबीयांचा समज झाला. दरम्यान कोने गावाच्या हद्दीत एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला असून सोशल मीडियावर फोटो बघून मुलाने ही आपली आई असल्याचे ओळखले.
मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर डोक्यावर धारधार शस्त्राने हल्ला केल्याचे निष्पन्न झाले असून महिलेच्या कानातील व गळ्यातील सर्व सोन्याचे दागिने लंपास असल्याचे पोलिसांच्या तपासात लक्षात आले आहे. सोन्याच्या लोभापाई या निष्पाप महिलेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून 15 सप्टेंबरला वाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
मृत्यूच्या 10 दिवसांतही मारेकर्यांना शोधण्यात पोलिसांना यश आलेले नसून आरोपींचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.दरम्यान वाड्यात घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान आरोपीच्या शोधासाठी पोलीस सखोल तपास करत असून लवकरच छडा लागेल असा अंदाज व्यक्त होत आहे.