वाडा तालुक्यात 35 गावांमध्ये एक गाव, एक गणपती  pudhari photo
पालघर

Palghar | वाडा तालुक्यात 35 गावांमध्ये एक गाव, एक गणपती

पीक गावाची सार्वजनिक गणेशोत्सवाची 77 वर्षांची परंपरा

पुढारी वृत्तसेवा

वाडा : मच्छिंद्र आगिवले

गणपती सण लय मोठा, नाही आनंदाचा तोटा असे ग्रामीण भागात म्हटले जात असून खर्‍या अर्थाने गणेशोत्सवाची धम्माल गावाकडेच लुटली जाते. घराघरात गणपतीची स्थापना अलीकडे केली जात असून यामागे नवस व्रत असल्याचेही अनेकजण खाजगीत सांगतात. खरी मज्जा ही सार्वजनिक उत्सवात बघायला मिळत असून वाडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये एक गाव,एक गणपती ही संकल्पना अस्तित्वात आहे.

हरतालिका पूजन हा गणेशोत्सवाचा पहिला सण असून माता पार्वतीचे पूजन करून विवाहित महिला व कुमारिका शृंगार करून उपवास धरतात. गावातील एखाद्या ठरलेल्या ठिकाणी सर्व महिला एकत्र येऊन शिवपार्वतीचे पूजन करतात यावेळी कथा वाचून महिला एकमेकींचे हळदीकुंकू करतात. रात्रभर महिला एकत्रीतपणे फुगड्या, नृत्य व गाणी म्हणून जागरण करतात. वाडा तालुक्यात जवळपास 1 हजार 100 ठिकाणी घरगुती गणेशोत्सव असून 79 सार्वजनिक मंडळ आहेत. 35 गावांमध्ये एक गाव, एक गणपती संकल्पना असून पोलिसांचा मोठा फौजफाटा सुरक्षेसाठी तैनात आहे.

तालुक्यातील पीक गावात सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे 77 वे वर्ष असून यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रम राबविले जाणार असल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले. ऐनशेत, ठूणावे अशा गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना अनेक वर्षांपासून राबविली जात असून गणेशोत्सवाचे खरे उद्दिष्ट्य याच गावांमध्ये साकार होत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. गणपती नंतर लगेच गौराईचे आगमन होत असून कळलावीच्या फुलांमध्ये बसणारी गौरी पर्यावरण रक्षणाचा आदर्श नमुना आहे.

गणेशोत्सवाची लगबग व खरेदीसाठी झुंबड उडालेली असून गणेशमूर्तीचे आगमन होत आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले असून पावसाने मात्र या सणात विरजण घातले आहे. तालुक्यात आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू असून पावसा आतातरी थांब रे बाबा असे साकडे घालण्याची वेळ लोकांवर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT