Palghar Vasai Rain Rescue Operation
खानिवडे : वसई-विरार शहरासह संपूर्ण वसई तालुक्यात शनिवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागालाही पावसाचा मोठा फटका बसला असून वसई पूर्वेतील सकवार येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या १३ नागरिकांची अग्निशमन दलाने धाडसी बचावमोहीम राबवून सुखरूप सुटका केली.
मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या सकवार परिसरात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पाण्यात विरार येथील १३ नागरिक अडकले होते. पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने अडकलेल्या नागरिकांसह त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिका, तहसील प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने बचावकार्य हाती घेत सर्व १३ जणांना सुरक्षित स्थळी हलविले. प्रशासनाच्या तत्पर प्रतिसादामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असून काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.