पालघर ः आठवडाभरापासून मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वाहनचालक आणि स्थानिकांची गैरसोय दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार विलास तरे यांनी महामार्ग प्राधिकरण तसेच महामार्ग वाहतूक पोलीसांना दिले.
निर्माणाधीन सातिवली उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर ढेकाळे येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वाहतूक पोलिसांच्या वरिष्ठ आणि स्थानिक पोलीस अधिकार्यांसोबत बैठक आयोजित केली होती. मुंबई अहमदाबाद महामार्ग मुंबई व गुजरात राज्यांना जोडणारा महत्वाचा महामार्ग आहे.औद्योगिक आणि व्यावसायिक वाहतूक तसेच दळण वळणासाठी महत्त्वाचा आहे.तारापूर औद्योगिक वसाहत, वसई - विरार महानगर क्षेत्र, तसेच तेथील विविध कारखाने,मालाची ने आण तसेच दैनंदिन व्यवहारांसाठी महामार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.परंतु आठवड्याभरापासून महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत असल्यामुळे वाहनचालक, प्रवाशी आणि स्थानिकांची मोठी गैरसोय होत आहे.
गेला आठवडाभर कोंडीची समस्या गंभीर आहे. वाहतूक कोंडीमुळे रुग्णांना रुग्णालयात पोहोचण्यास अडथळा होत असल्यामुळे गंभीर आजारी रुग्णांना धोका निर्माण होत आहे.तारापूर एमआयडीसी मधील कारखान्यात निर्मित मालाच्या वाहतुकीस विलंबाचा परिणाम औद्योगिक गतीवर होत आहे, वेळेत कामावर पोहोचता न आल्याने नोकरदारांची गैरहजेरी लागत आहे. महामार्गावरील सातिवली उड्डाणपुलाचे काम अपूर्ण अवस्थेत असून सर्व्हिस रोडची चाळण झाली आहे.व्हाईट टॉपिंगचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत आहे.
खड्ड्यांमुळे अपघात व वाहतुकीचा अडथळा निर्माण होत आहे.निर्माण होणार्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक तसेच स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करून वाहतूक नियोजन तसेच यंत्रणांमध्ये समन्वय साधून नागरिकांना दिलासा मिळवून देण्याच्या अनुषंगाने आमदार विलास तरे यांच्या ढेकाळे येथील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संबधीत ठेकदारांने 15 दिवसात सातीवली उड्डाणपूलाच्या सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, प्राधिकरण अभियंता आर. राय, संतोष सैनिस, महामार्ग वाहतूक पोलीस ठाणे पोलीस प्रभारी उप अधीक्षक संतोष खानविलकर, वसई - पालघर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी औदुंबर गवई, मिरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखा वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश शेटे, पोलीस उप निरीक्षक संतोष शेंडगे, मनोहर पाटील, आणि टीमा असोसिएशनचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
विरार ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सातिवली येथील पुलाचे सुरू असलेले दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम नियोजनाअभावी वाहनचालकांसाठी मोठी अडचण ठरत आहे. वाहतूक कोंडीमुळे 10 ते 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. सातिवली पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी एकही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी, महामार्गावरून जाणार्या वाहनांना अनेक तास रस्त्यावरच अडकून राहावे लागत आहे. विशेषतः मुंबई, ठाणे आणि विरार दिशेने येणार्या व जाणार्या वाहनांच्या गर्दीमुळे परिस्थिती अधिक बिकट बनली आहे.