Palghar Zilla Parishad Water Issue Pudhari
पालघर

Palghar News | शिरसगावात 'जलजीवन'च्या हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा नियोजनशून्य कारभार

पुढारी वृत्तसेवा

Palghar Zilla Parishad Water Issue

दीपक गायकवाड

खोडाळा : संपूर्ण मोखाडा तालुक्याला टँकरमुक्त करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. काही गावांमध्ये या योजनेतून शुध्द पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. तर काही ठिकाणी निधीची कमतरता आणि तांत्रिक अडचणींमुळे या योजनेला मूर्त स्वरूप देता आलेले नाही.

परंतु, ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरु झाला आहे. अशा बहूतांश ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियोजन शून्य कारभारामुळे अनाठायी वाहून गेल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

भरपूर लोकसंख्या, दुय्यम बाजारपेठ असलेल्या खोडाळा सारख्या महत्वपूर्ण गावचा बंधारा आटल्याने पिण्याच्या शुद्ध पाण्याची मोठ्या प्रमाणावर परवड सुरू झालेली आहे.याबाबत दस्तूरखुद्द खासदार डॉ हेमंत सवरा यांनी जातीने लक्ष घालून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला येथील पाणीपुरवठा तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले होते.तसे ग्रामपंचायत प्रशासनानेही वारंवार मागणी नोंदवूनही मजीप्राकडून कमालीची चालढकल केली जात होती.त्यामूळे खोडाळा येथील ग्रामस्थांना तब्बल 2 महिन्यांपासून अशुद्ध पाण्यावरच नैमित्तिक गरजा आणि आपली तहान भागवावी लागत आहे.

दोन्हीही घरचा पाहुणा तहानलेला

दस्तुरखुद्द खोडाळा च्या प्रमूख बाजारपेठेला लागूनच असलेल्या भैरवनाथ मंदिर परिसर आणि त्यापूढील वसाहतीला आज तागायत कोणत्याही स्तरावरून पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.त्यामुळे या भागातील वसाहतीची अवस्था ही दोन्ही घरचा पाहुणा तहानलेला अशी दुर्धर झालेली आहे.याभागात तातडीने जलकुंभ बसविण्याची मागणी केली जात आहे.परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरण त्याबाबत कमालीची दिरंगाई करत आहे.

एकीकडे पाण्याचा वारेमाप विसर्ग तर दुसरीकडे मात्र कृत्रीम पाणीटंचाई या दोन्हीही प्राप्त परिस्थितीत जनतेलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.पाणी पुरवठ्यातील या विषमतेतून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा पाणी पुरवठ्यातील नियोजनशून्य विरोधाभास प्रकर्षाने प्रतित होत आहे.परिसरातील जनतेला सांडपाण्यातून पिण्यासाठी पाणी घेण्यास मज्जाव करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना वारेमाप अनाठायी वाहून जाणारे पाणी दिसत नाही काय..? असा सवाल या धर्तीवर उपस्थित केला जात आहे.

बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

मोखाडा तालुक्यात बहुतांश ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अनाठायी विसर्ग होत असतो. मौजे शिरसगाव येथेही दि 22 एप्रिल रोजी जलकुंभ भरुन वाहून जात असतानाही बराच वेळ पाणी पुरवठा खंडित करण्यात आला नाही. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे बाजूलाच असलेल्या देवबांध नदीच्या कोरड्या पात्राला अक्षरशः उधान आले होते. याबाबतची वस्तुस्थिती भ्रमणध्वनीवरून कळविली असता संबंधित कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असून अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते बन्सी हमरे यांनी केली आहे.

याबाबत वस्तुस्थिती पडताळून कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वक्तशीर कामाची समज आणि ताकीद दिली जाईल
- प्रथमेश सावंत, उप अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT