पाण्यासाठी सायदे ग्रामस्थांचा बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा  
पालघर

Palghar water crisis : पाण्यासाठी सायदे ग्रामस्थांचा बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

सायदे आणि बारा पाड्यात तीव्र पाणीटंचाई

पुढारी वृत्तसेवा

पालघर : सायदे जोगलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे २७ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि शेकडो ग्रामस्थांनी थेट पाण्याच्या टाकीजवळ एक दिवसीय धरणे आंदोलन केले होते. तत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जलजीवन मिशनचे ठेकेदार आणि अधिकारी यांनी ३१ मार्च अखेरपर्यंत नळपाणी पुरवठा योजना सुरू करण्याचे लेखी आश्वासन देऊन वेळ मारून नेली होती.परंतु त्यानंतरही ग्रामपंचायत हद्दीत कोणतेही काम न केल्याने येथील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परिणाम स्वरुप येथील ग्रामपंचायत प्रशासनाने ९ एप्रिलपासून थेट जलकुंभाजवळ बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सायदे महसूल ग्रामपंचायत हद्दीतील मौजे वाघ्याची वाडी, सावरपाडा, हट्टीपाडा, अंधेरवाडी, हुंड्याची वाडी, बादलपाडा, खडकवाडी, मारुतीचीवाडी, बोरीचीवाडी, जांभूळवाडी इत्यादी १२ गाव पाड्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यामुळे येथे तातडीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, यासाठी सायदे आणि बारा गाव पाड्यातील ग्रामस्थांनी थेट जलजीवन मिशनच्या टाकीजवळ माहे फेब्रुवारी महिन्यात धरणे आंदोलन केले होते. यावेळी पाण्याची व्यवस्था करा अन्यथा धरणे आंदोलन तीव्र करू, असा एकच सूर येथील ग्रामस्थांनी लावला होता. त्यापुढे जलजीवन मिशनचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी नमते घेऊन ३१ मार्चपर्यंत काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे तूर्तास हे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले. तथापी ३१ मार्च उलटूनही आजपर्यंत कोणतेही पाणीपुरवठ्याचे काम न झाल्याने सायदे जोगलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी ९ एप्रिलपासून सनदशिरपणे बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

मोखाडा तालुक्यात सर्वत्र शेकडो कोटीची जलजीवन मिशनची कामे करण्यात आलेली आहेत. यातील काही ठिकाणी हर घर नल योजनेतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. तर काही ठिकाणी नुसत्याच टाक्या उभ्या केलेल्या आहेत. त्यामुळे टाकीत पाणी दिसत असले तरी ग्रामस्थांना त्याचा उपभोग घेता येत नाही. व येथून पाण्यासाठी बसवलेल्या व्हाल्व्हमधून तहानलेल्या ग्रामस्थांनी परस्पर पाणी उपसा केला तर अशा ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्याची धमकी संबंधितांकडून दिली जात आहे. तसेच या ठिकाणी जलजीवन मिशनचे काम झाले असल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठाही केला जात नाही, त्यामुळे येथील ग्रामस्थांची "आई जेवू घालीना, तर बाप भीक मागू देईना" अशी अवस्था झालेली आहे. याबाबत तातडीने कार्यवाही होणे अपेक्षित आहे अन्यथा जलजीवन मिशन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

SCROLL FOR NEXT