पालघर : पालघर मधील सर्वात रहदारीचा रस्ता म्हणून केनम शाळा जुनी ते आंबेडकर चौक रस्त्याचे आज भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजनात भाजप शिवसेना नगरसेवक एकमेकांना भिडले. शिवसेना जिल्हा प्रमुख नगराध्यक्ष यांच्यासह भाजप गटनेते, उबाठा गटनेते यांच्यात बाचाबाची थेट शिवीगाळ करण्या पर्यंत मजल गेली. भाजप गटनेते यांनी निषेध नोंदवत भूमिपूजनमध्ये केवळ बघ्याची भूमिका घेतली. याने मात्र रस्त्याने जाणाऱ्या लोकांना एक तमाशा बघायला मिळाला.
पालघर शहरातील मोठी समस्या बनलेला सातपाटी जाणारा रोड केनम शाळा ते आंबेडकर चौक हा दर वर्षी पावसाळ्यात तुटला फुटला जातो. दैनिक पुढारीने अनेक वेळा यावर आवाज उठवला होता. अखेर 2 कोटी 92 लाखांचा निधी कामासाठी मंजूर झाला. टेंडर झाले कामाचा शुभारंभ करण्यासाठी आज नगरपालिका यांच्याकडून रात्री उशिरा कळवल्याचा आरोप भाजप उबाठा नगरसेवक गटनेत्यांनी केला. हा कार्यक्रम नगरपालिकेचा असल्याने इथे मुख्याधिकारी नगराध्यक्ष सर्व गटनेते स्थानिक नगरसेवक असायला हवे होते. मात्र शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख शहर प्रमुख यांच्यासह इतर नेते असल्याची पत्रिका समाज माध्यमातून फिरली. भाजपा गटनेते यांनी याविषयी आक्षेप नोंदवत याचा निषेध केला. हा कार्यक्रम राजकीय पक्षांचा नसून नगरपरिषद यांचा असल्याने निमंत्रण पत्रिकेत केवळ तीच नावे असायला हवे. जर शिवसेना नेत्यांची नावे टाकली तर भाजप नेत्यांची नावे का टाकली नाही. मुळात हा चुकीचा पायंडा शिवसेना टाकत आहे, आम्ही त्याचा निषेध करतो. असे सांगत नारळ फोडण्यापासून लांब राहिले.
शिवसेना नगराध्यक्ष उत्तम घरत आणि गटनेते भाजप भावानंद संखे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू असताना त्यात जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता भावानंद संखे यांचा वाढलेला आवाज शहर प्रमुख राहुल घरत आणि इतर शिवसैनिक धावून आले. एकमेकांना शिवीगाळ करण्यापर्यंत वाद वाढला. चुकीचा पायंडा नको हा विरोधी गटनेते यांचा आग्रह अखेर पर्यंत सुरू होता. पुढे असे होणार नाही असे सांगून उत्तम घरत यांनी अखेर गटनेत्यांची समजूत काढली.
नगरपरिषद यांच्या कार्यक्रमात नियमनुसार असणारे लोकांची नावे पत्रिकेत होती. मात्र सोशल मीडियात दुसरीच पत्रिका आल्याने गैरसमज निर्माण झाले. चुकीचा पायंडा निर्माण होणार नाही याची खबरदारी या पुढे घेतली जाईल. आम्ही सर्व गटनेते आणि पदाधिकारी यांची पत्रिका तयार केली होती. - उत्तम घरत, पालघर नगराध्यक्ष.
शिवसेना पक्षाने आज नगरपरिषद यांचा कार्यक्रम हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आम्ही तो हानून पडला. चुकीचा पायंडा नको हीच आमची मागणी होती. - भावानंद संखे, सामाजिक कार्यकर्ते, गटनेते भाजप..