हनिफ शेख
पालघर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काल पालघर या ठिकाणी पाहणी दौरा होता यादरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे देताना फडणवीस यांनी एकाच विमानातून उद्धव ठाकरे आणि त्यांनी प्रवास केलेल्या प्रश्नाबाबत अनेक खुलासे केले. यावेळी आपण पंतप्रधान पदाचे दावेदार ठरणार असून यामुळे फडणवीस यांचे पंख छाटले जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. असा प्रश्न पत्रकारांनी फडणवीस यांना विचारला.
यावर उत्तर देताना फडणवीस यांनी सांगितले की मी माणूस असून मला पंख नाहीत आणि दुसरा मुद्दा यातून ठाकरे हे मला सदिच्छा देत आहेत मात्र अशा सदिच्छा त्यांनी २०१९ मध्ये दिल्या असत्या तर आज चित्र वेगळे असतं असा देखील टोला त्यांनी ठाकरे यांना लगावला.
यावेळी फडणवीस यांनी सांगितले की आम्ही सर्विस विमानात ज्यामध्ये कोणीही सर्वसामान्य व्यक्ती प्रवास करू शकतो अशा विमानात बसलेलो होतो ते त्या कोपऱ्यात होते मी या कोपऱ्यात होतो मात्र यावर गेल्या काही दिवसात एवढ्या काही मोठ्या चर्चा रंगल्या आहेत की त्यातून आपण राजकीय व्यवस्थेत आहोत की येड्यांच्या बाजारात असा प्रश्न पडतो आणि जर ते माझ्या शेजारी बसले असते तर आम्ही गप्पाच मारल्या असत्या असेही फडणवीस यावेळी बोलले.
पुढे पत्रकारांनी असेही विचारले की तुमच्या चेहऱ्यावर हतबलता असल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की मी प्रवासात अनेकदा काही डाऊनलोड केलेले व्हिडिओ ओटीटी वरील वेब सिरीज मी पाहत असतो त्यामुळे त्या संपूर्ण प्रवासात माझं लक्ष मोबाईल मध्ये होतं. अशावेळी ठाकरेंना माझ्या चेहऱ्यावरची हतबलता कशी काय दिसली हा ही प्रश्नच आहे असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
पुढे फडणवीस म्हणाले की हे असे राजकीय प्रश्न माझ्यासाठी गौण असून अशा प्रश्नांनी कोणाचं भलं होणार नाही.यामुळे मी अशा राजकीय प्रश्नांना महत्त्व न देता कामावर अधिक लक्ष केंद्रित करतो याशिवाय राज्यातील १४ कोटी लोकांचा आशीर्वाद माझ्यासोबत असल्याने मला काहीही होणार नाही असे यावेळी फडणवीस यांनी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण पोर्ट स्थळ, डहाणू वाढवण पोर्ट प्रकल्प कामकाजाबाबत आढावा बैठक तसेच प्रस्तावित विमानतळ स्थळाची पाहणी, मुंबई-बडोदा एक्सप्रेस वे च्या इंटर जंक्शनची पाहणी व उत्तन-विरार सी-लिंकबाबत चर्चा देखील केल्या.