पालघर

टकमक गडावर हरवले पर्यटक; पोलिसांची धाडसी शोधमोहीम, तिघांची सुखरूप सुटका

Palghar news | याआधीही जानेवारी महिन्यात अशाच प्रकारे पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने एका पर्यटकाची सुटका केली होती

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : वसई पूर्वेतील ऐतिहासिक आणि निसर्गरम्य टकमक गडावर फिरायला गेलेल्या तीन पर्यटकांची शनिवारी जंगलात भरकटून अडचणीत सापडण्याची घटना घडली. मात्र मांडवी पोलिसांनी तत्परता दाखवत जंगलात शोधमोहीम राबवून या तिघांना सुखरूप बाहेर काढले.

मुंबईतील नेपियनसी रोड व मलबार हिल परिसरात राहणारे गोविंद शरण तामंग (३०), रिबेका रसीम तामंग (२५) व हसीना असीम तामंग (२३) हे तिघे सकवार गावामागील पायवाटेने टकमक गडावर गेले होते. गड पाहून परत येताना त्यांनी चुकीचा उतार पकडल्याने ते घनदाट झाडी, तीव्र उतार आणि दगडी ओहळांच्या भागात अडकले. जवळपास दोन ते तीन तास ते मार्ग शोधत भटकत राहिले.

सुदैवाने मोबाईल नेटवर्क सुरू असल्याने त्यांनी ११२ वर संपर्क साधून पोलिसांना मदतीची विनंती केली. या परिसरात यापूर्वीही अशा घटना घडल्याने मांडवी पोलिसांना संभाव्य ठिकाणांची कल्पना होती. पोलिस हवालदार राहुल वाघ व पोलिस अंमलदार वामन शिंगाडे यांनी तत्काळ जंगलात शोधमोहीम सुरू केली आणि सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पर्यटकांना सुखरूप शोधून काढले. पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधीही जानेवारी महिन्यात अशाच प्रकारे पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने एका पर्यटकाची सुटका केली होती.

पर्यटकांना आवाहन

टकमक गड वरकरणी सोपा वाटला तरी उतरताना धोकादायक ठरतो. अरुंद वाटा, दाट जंगल आणि दिशाभूल करणारे शॉर्टकट्स यामुळे अनेक जण भरकटतात. त्यामुळे गडावर जाण्यापूर्वी स्थानिकांची मदत घ्यावी किंवा पोलिसांकडून माहिती घेऊनच ट्रेक करावा, असे आवाहन मांडवी पोलिसांनी केले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT