जव्हार; पुढारी वृत्तसेवा : सध्या पितृपक्ष सुरू असून पितृपक्षात कावळ्यांना श्राद्ध भोजन खाऊ घालण्याचे विशेष महत्त्व आहे. गरुड पुराणात तर कावळ्यांना यमाचे प्रतीक मानले जाते. श्राद्ध भोजनाचा घास कावळ्याने ग्रहण केला तर पितरांच्या आत्म्याला शांती मिळते, असे मानले जाते. वाढत्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यामुळे कावळे गावसोडुन गावाबाहेर गेले आहेत, त्यामुळे पित्राला काव घास ठेवल्या नंतर काव काव ओरडून देखील कावळे तासन् तास येत नाहीत, मग कावळा आलाच नाही तर नाईलाजास्तव कावळ्याचा घास इतर प्राण्याला अथवा गाईला घालतात.
मात्र दुसरीकडे जव्हार शहरात असा एक औलीया आहे की, सकाळी कावळ्यांना नुसता आवाज दिला तर ५०- ६० कावळे लगेच जमतात. त्या औलीयाचं नाव आहे सुरेश मगण गवळी त्यांचं जव्हार च्या हनुमान पॉईंट येथे वडापावच दुकान आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून ते दुकानातील वडा, भजी, सॅन्डविच यांचा चुरा उरलेले पाव, बडे संध्याकाळी गोळा करुन ते चुरून सकाळी कावळ्यांना खायला देतात. त्यामुळे अगदी सकाळी कावळे काव काव करत गवळी यांच्या दुकानासमोर त्यांची वाट पाहात बसतात. वास्तविक पाहिलं तर दूसरे दुकानदार वडा, भजी व उरलेले इतर पदार्थ मिस्कर मध्ये बारीक करून त्यामध्ये तिखट मिठ, लसूण टाकून त्याची चटणी करुन पुन्हा ग्राहकांना देतात व पैसे कमावितात
पक्षांवर देखील आपण दया दाखवली पाहिजे, केवळ पितरा पुरताच कावळ्यांचा वापर करणं चुकीचं आहे. असे ते मानतात सुरेश गवळी हे शिवसैनिक असून गेल्या वीस वर्षांपूर्वी ते जव्हार नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष होते. त्यानंतर त्यांना निवडणूकीत फारसा रस नसल्याने ते वडापावचे दुकानं चालवु लागले.. शिवसैनिक असल्यामुळे समाज सेवेची आवड त्यांच्या रक्तात भिनलेली असल्याने ते कोणी गरीब अपंग असलेल्या व्यक्तीला फुकट नाष्टा देतात तसेच न चुकता सकाळी , कावळ्यांना खायला देण्याचं काम ते पंधरा वर्षांपासून अविरतपणे करत असुन कावळे त्यांचे मित्र झाले आहेत.