पालघर : समाजमाध्यमांवर पेट्रोल-डिझेलच्या संभाव्य तुटवड्याबाबत पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी तातडीची पावले उचलत निर्बंध लागू करण्यासाठी आदेश पारित केले आहेत. सार्वजनिक सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थांची मुक्त विक्री झाल्यास अनुचित घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी पेट्रोल-डिझेल विक्रीसंदर्भात महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. पेट्रोलियम नियम, २००२ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत.
अनधिकृत साठा किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ‘जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५’, ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३’ तसेच ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५’ अंतर्गत कठोर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आदेशात देण्यात आला आहे.
समाजमाध्यमांवर पेट्रोल-डिझेलच्या संभाव्य तुटवड्याबाबत पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी बीपीसीएल, आयओसीएल, एचपीसीएल, रिलायन्स आणि नायरा या कंपन्यांचे सेल्स अधिकारी, पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तसेच गॅस वितरण कंपन्यांचे जिल्हा नोडल अधिकारी यांच्यासमवेत तातडीची बैठक घेतली.
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. “जिल्ह्यात इंधनाचा पुरवठा सुरळीत असून घाबरण्याचे कारण नाही. नियमांचे पालन करणे हेच सर्वांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.
पेट्रोल व डिझेल केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच भरणे बंधनकारक
कॅन, बाटली, डबा किंवा इतर कोणत्याही भांड्यात विक्रीस सक्त मनाई
सर्व पेट्रोल पंपांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे बंधनकारक
विक्री नोंदी नियमितपणे अद्ययावत ठेवण्याचे आदेश
नियमभंग केल्यास कडक कारवाई