खानिवडे ः पालघर जिल्ह्यातील आवणीची कामे आटपत आली असून रोप टंचाई, मजूर टंचाई, महागाई आणि निसर्गीय पावसाच्या पाठशिवणीच्या खेळाचा सामना करत तसच आवणीचा एखादं दुसरा प्रलंबित प्रकार वगळता जवळपास सर्वत्र आवण्या आटोपल्या आहेत.
पुढे शेत बेणनी सुरू व्हायला अजून उशीर आहे. तसेच गौरी गणपतीचा सण पंधरवड्यावर आहे. यामुळे आता मिळालेल्या मोकळ्या वेळेचा उपयोग शेतकामातील शेत बंधांवरील तूर व वाल लागवड करण्याकरिता शेतकर्यांकडून सुरू झाला आहे. आता बरेच शेतकरी हातात विळा घेऊन बंधांवरील गवत व झुडपे साफ करून वाल तूर लागवड करण्यात गुंतू लागले आहेत. ही लागवड पावसाळा संपताना नवरात्रीच्या काळात भात कापणीच्या वेळेला पीक देते.
आताच्या या बांध लागवडीच्या पावटा, सफेद वाल, लाल वाल व तूर यांच्या हिरव्या शेंगा भाजीसाठी व बाफून खाण्यात येतात. ह्या खूप चविष्ठ लागतात. फक्त चवीपुरते मीठ आणि थोडेसे पाणी वापरून बाफलेल्या (वाफवलेल्या) या शेंगा हंगामात जिल्ह्यातील प्रत्येक घरात हमखास आणि मोठ्या चवीने खाल्ल्या जातात.तर वालाचे हिरवे गोळे शाकाहारी व मांसाहारी भाजीत खूप चवदार लागतात. श्रावण आता अर्ध्यावर आला आहे. यापुढे पाऊस हा बेताचा व वरवर असतो. वाल तूर लागवड ही बंधांवर होत असल्याने व आताचा मोसम हा अनुकूल असल्याने बंधांवरील लागवड सुरू केली आहे.