मोखाडा (पालघर) : हनिफ शेख
आजच्या स्मार्ट भारत डिजीटल इंडियाच्या युगात जव्हार तालुक्यातील राजेवाडी येथे गॅस्ट्रोने दोन आदिवासी नागरिकांचा जीव गेला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असताना आता पालघर जिल्हा शासन यंत्रणा वराती मागून घोडे नाचवण्याचा प्रयत्न होत आहे.
आता गावात विविध ठिकाणी सूचना फलक, नोटीस चिकटवणे असे प्रयत्न करीत आहेत. खरतर पाणीपुरवठा विभाग आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत विभाग आज त्या गावात ज्या उपाययोजना करीत आहेत त्या सर्व बाबी मान्सून पूर्व तयारी मध्ये मोडल्या जातात मात्र आता दोन जीव गेल्यानंतर सदरच्या यंत्रणा जाग्या झाल्या आहेत.
राजेवाडी गावात खासदार हेमंत सवरा, नांदगाव ग्रामपंचायत मधील माजी झेडपी अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे आदी नी नुकत्याच भेटी दिल्या आणि प्रशासन ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून योग्य त्या खबरदारी घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत मात्र यावेळी या दोन जीवांचे पाप कोणाचे याची जबादारी कोणाची हे अजूनही निश्चित झालेले नाही.
मुळात या गावात पाणी पिण्यासाठी दोन विहिरी आहेत एक काट्याची विहिर आणि दुसरी चाफ्याची विहीर या दोन्ही विहिरीत येथील पाणी पुरवठा करणारी जुनी योजना असून उन्हाळ्यात दोन्ही विहिरीत पाणी सोडले जाते. मात्र दर पावसाळ्यात ही पाणीपुरवठा योजना बंद केली जात असल्याचा गंभीर आरोप येथील ग्रामस्थानी केला आहे. कारण पावसाळ्यात पाणी पुरवठा योजना बंद करावी असा नियम आहे का हा प्रश्न येथे उपस्थित होतो. यातील चाफ्याची विहिरीला स्वतःचा पाण्याचा स्रोत असल्याने येथील पाण्याचा उपसा आणि भरणा होतो मात्र काट्याच्या विहिरीला पाण्याचा स्रोत नसून पावसाळ्यात पडणारा पाऊस, तसेच झिरपणाऱ्या पाण्यातूनच याविहिरीला पाणी येते ज्याला साठपणी सांगितले जाते यामुळे आजूबाजूची शेण, गटारी, घाण याचे पाणी या विहिरीत मुरून ते दूषित झाले आणि याच पाण्यातून गावात गॅस्ट्रोची साथ आली त्यात दोन जणांचा मृत्यू झाला.
आता प्रश्न उभा राहतो तो हा की घरोघरी जावून डेंग्यू ची साथ रोखण्यासाठी पाणी साठवून ठेवू नका, कुलर, टायर, झाडांच्या कुंड्या येथे पाणी साचू देवू नये यासाठीच्या सूचना देणारे आरोग्य विभाग जिथे अख्खी एक विहीर साठ पाण्याची आहे आणि तिथून लोक पाणी पित आहेत एवढी गंभीर बाब कोणाच्याच कशी लक्षात आली नाही. गावात साथ पसरते आजही २४ रुग्ण उपचार घेत आहेत. उपचार सुरू असताना रुग्ण घरी निघून जातात आरोग्य विभागाचा जणू पोर खेळ सुरू असल्याचे चित्र दिसून येते.
यानंतर आज गावात गेल्या नंतर जिथे शेणखत टाकले जाते तिथे TCL ची पावडर टाकून येथे कचरा टाकू नये असा सूचना फलक लावण्यात आला आहे, प्रत्येकाच्या घरावर एवढेच काय ज्या घराचा कर्ता गेला त्याच्याही घरावर आता ग्रामपंचायत कडून त्या विहिरीचे पाणी पिऊ नये पिल्यास काही झाल्यास तुम्हीच जबाबदार राहणार ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही अशी नोटीस चिकटवण्यात आली आहे. ज्या घराचा कुटुंब प्रमुख या सगळ्या यंत्रणेच्या हलगर्जी पणाचा बळी ठरला त्यांनी आता जबाबदारी कशी स्वीकारायची हा खरा सवाल आहे.
यामुळे आज बंद असलेली पाणी पुरवठा योजना सुरू करणे, दूषित पाणी पिणे बंद करणे, शेण घाण विहिरीचा आजूबाजूला न टाकू देणे अशा उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत मात्र आज घटना घडल्या नंतर जे होतय ते घटना घडण्याच्या अगोदर व्हायला हवं होत एवढे नक्की.
मी गावात जावून पाहणी केली त्या विहिरीचे पाणी पिण्यास बंद केले आहे. जलस्वराज्य ची योजना आहे त्यातून १७/१८ स्टैंड पोस्ट तयार करुन ते ही तपासून पाणी पिण्यासाठी वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. काल पाच दिवसा नंतरही एक लहान मुलगा गॅस्ट्रो सदृश्य आढळून आल्याची बाब गंभीर आहे सर्व घरांचा सर्व्हे करून तपासणी करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, कुटीर रुग्णालय जव्हार आणि पिडीत कुटुंबियांच्या भेटी घेतल्या.डॉ हेमंत सवरा, खासदार, पालघर लोकसभा
आपल्या परिसराची स्वच्छता ठेवा, आपल्या घराची स्वच्छता ठेवा, नियम पाळा त्या विहिरीचे पाणी पिवू नका किमान एवढी मोठी घटना घडल्या नंतर तरी आपण सावध व्हायला हवे. आम्ही सर्व शुद्ध पाणी देण्याबाबतच्या उपाययोजना तातडीने करीत आहोत. पूर्ण उपचार घ्या, घरी जाण्याची घाई करू नका.मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर.
मी स्वतः या संपूर्ण परिसराची दोन्ही विहिरींची पाहणी केली जे झालं ते अतिशय वाईट आहे. कारण स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर केवळ पिण्याचे शुद्ध पाणी मिळू नये त्यातून आमच्या दोन आदिवासी बांधवांचा मृत्यू व्हावा हे दुर्दैवी आहे. मी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र घटना घडल्या नंतर उपाययोजना करण्या ऐवजी त्या होवू नये यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा आदिवासींच्या जीवाच काही मूल्यंच राहणार नाही.प्रकाश निकम, माजी झेडपी अध्यक्ष, पालघर