पालघर

Palghar News |अवजड वाहतुकीचा बळी ठरला वडघर पूल; आयवाच्या भाराने पुलासह कार कोसळली

दोन मोठ्या गावांसह १५ पाड्यांचा संपर्क तुटला:

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : वसई पूर्वेतील मेढे–वडघर मार्गाच्या नाल्यावरील जुना आणि कमी भारक्षमतेचा पूल शनिवारी दुपारी अवजड आयवा ट्रकच्या वजनाने अचानक कोसळला. याचवेळी समोरून येणारी कारही पुलासह खाली कोसळल्याने तिचा चालक जखमी झाला. या दुर्घटनेमुळे वडघरसह दोन मोठी गावे आणि सुमारे १५ पाड्यांचा संपर्क तुटला असून हजारो ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

महापालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी लागणाऱ्या गौण खनिजाची वाहतूक सध्या मोठ्या प्रमाणावर आयवा ट्रकद्वारे केली जात आहे. मात्र, या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन भरून ग्रामीण भागातील कमी क्षमतेच्या रस्ते व पुलांवरून वाहतूक होत असल्याने अशा दुर्घटनांचा धोका वाढला आहे. वडघर येथील पूल कोसळल्याने या समस्येची तीव्रता पुन्हा एकदा समोर आली आहे.

या दुर्घटनेमुळे वडघर, कळभोण, खैरीपाडा, लेंडीपाडा, घोगाटपाडा आदी गाव-पाड्यांचा संपर्क तुटला आहे. पुलाच्या पलीकडे राहणाऱ्या हजारो नागरिकांना आता प्रवाही नाला ओलांडून जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. हा जिल्हा परिषदेकडील सुमारे २० ते २५ वर्षे जुना रस्ता असल्याचे स्थानिकांनी सांगितले. घटनेच्या वेळी वडघर गावात दिवस कार्य असल्याने वाडा तालुक्यातील बोरांडा येथून नातेवाईक कारने येत होते.

कार पूल ओलांडत असतानाच समोरून अवजड आयवा ट्रक आला आणि त्याच्या भारामुळे पूल क्षणार्धात कोसळला. ट्रक आणि कार दोन्ही वाहने पुलासह खाली पडली. सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र कारचालक जखमी झाला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत क्षमतेपेक्षा अधिक वजन घेऊन वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची तसेच वडघर येथे नव्या आणि मजबूत पुलाची उभारणी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT