पालघर

Vasai News : वसईत 'बहिरव दुर्ग' असल्याचे नवे पुरावे; इतिहास संशोधकांकडून शोधमोहीम सुरू

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेल्या वसईत आणखी एका अज्ञात किल्ल्याचे अस्तित्व समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोडी लिपीतील जुन्या कागदपत्रांच्या अभ्यासातून 'बहिरव दुर्ग' नावाच्या किल्ल्याचा उल्लेख आढळून आला असून, तो वसई पूर्वेतील कामण दुर्गाच्या परिसरात असावा, असा प्राथमिक अंदाज इतिहास संशोधक यांनी व्यक्त केला आहे. यानंतर त्यांनी या किल्ल्याचा प्रत्यक्ष शोध सुरू केला आहे.

राऊत यांच्या माहितीनुसार, वसई मोहिमेनंतरच्या मोडी कागदपत्रांमध्ये दसरा आणि जत्रेनिमित्त विविध देवस्थानांवर झालेल्या खर्चाची नोंद आहे. त्यामध्ये "बहिरव दुर्ग... कामण दुर्गाजवळ आहे" असा स्पष्ट उल्लेख आढळतो. तसेच त्या ठिकाणच्या देवतांना बकऱ्यांचा नैवेद्य अर्पण केल्याचीही नोंद आहे. यावरून त्या परिसरात किल्ला आणि देवस्थान अस्तित्वात होते, असे संकेत मिळतात.

कामण दुर्गाचे प्राचीन नाव कामवन दुर्ग असल्याचेही या कागदपत्रांतून स्पष्ट होते. त्या परिसरात आसरा, महिषासूर, वाघ्या आणि चेड़ा यांसारख्या स्थानिक देवतांची पूजा होत असल्याच्या नोंदीही सापडल्या आहेत. आजही आदिवासी समाजात या देवतांची पूजा केली जाते. मात्र, त्यांची मूळ स्थाने काळाच्या ओघात नष्ट झाल्याचे संशोधकांचे मत आहे.

सध्या उपलब्ध इतिहासग्रंथांमध्ये बहिरव दुर्गाचा उल्लेख किंवा नेमके स्थान आढळत नाही. त्यामुळे कामण परिसरातील टेकड्या, जुन्या पाण्याच्या टाक्या आणि जंगलातील अवशेषांची प्रत्यक्ष पाहणी करून या किल्ल्याचा शोध घेण्यात येणार आहे. या संशोधनातून बहिरव दुर्गाचे अस्तित्व सिद्ध झाल्यास वसईच्या इतिहासात आणखी एका किल्ल्याची भर पडणार असून, इतिहास संशोधनाला नवी दिशा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT