सफाळे (पालघर): सफाळे येथील कोरे गावचा बाल वैज्ञानिक कु. मीत अंजली जयगणेश तांडेल याने अमेरिकेतील नासाच्या यू.एस. स्पेस अँड रॉकेट सेंटर, हंट्सविले (अलबामा) येथे सात दिवसांचा अत्यंत प्रतिष्ठित स्पेस कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण करून परतला आहे. महाराष्ट्रातून निवड झालेला तो एकमेव विद्यार्थी असून भारतातील एकूण सात विद्यार्थ्यांसोबत त्याने हा आंतरराष्ट्रीय स्पेस कॅम्प पूर्ण केला आहे.
पुणे येथील स्वान फाउंडेशन आणि सेडर इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट २०२३ मध्ये देशभरातून ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. जवळपास ५००० विद्यार्थ्यांमधून मीतने डिस्टिंक्शनसह पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण होत नासाच्या स्पेस कॅम्पसाठी निवड मिळवली. पुढील दोन वर्षांत पासपोर्ट, व्हिसा, अभ्यासक्रमातील ताणामुळे अनेक विद्यार्थी मागे हटले, तर काहींना व्हिसा मिळाला नाही. शेवटी भारतातून फक्त सातच विद्यार्थी या मोहिमेसाठी निघाले, त्यातील महाराष्ट्रातून एकटाच मीत तांडेल होता.
मीत आपल्या टीमसह मुंबई विमानतळावरून निघून नेदरलँड मार्गे अटलांटा येथे पोहोचला. प्रवासात दोन वेळा उड्डाणबिघाडासारखे प्रसंग आले तरीही त्याने अदम्य धैर्य दाखवले. नासा स्पेस कॅम्पमध्ये मीतने अनेक वैज्ञानिक आणि साहसी उपक्रम पूर्ण केले. तारांगण निरीक्षण, जी-फोर्स व गुरुत्वाकर्षण अनुभव, रॉकेट इंजिनची रचना व मिनी रॉकेट बनविणे, मूनवॉक अनुभव, स्पेस स्टेशन वर्कशॉप, एअर कॅनन, प्रकाशाचे अपवर्तन-अपवर्तन, चुंबकीय खेळ, अंतराळवीरांचे प्रशिक्षण, अन्न, सूट माहिती, टीमवर्कद्वारे प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा अनुभव या सर्व उपक्रमांत तो सर्वोत्तम कामगिरी करणारा विद्यार्थी ठरला. त्यामुळे नासा सेंटरकडून त्याला गोल्ड कॉइन देऊन सन्मानित करण्यात आले. मीतच्या सहा वर्षांच्या सातत्यपूर्ण अवकाश-अभ्यासामुळे आणि उत्कृष्ट मुलाखतीमुळे त्याला इतर विद्याथ्यपिक्षा अधिक म्हणजे १० वर्षांचा यू.एस. व्हिसा देण्यात आला. नासा अधिकृत ऍम्बेसेडर सुदेशना परमार व आयेशा सय्यद यांनी मीतला पुढील उच्चस्तरीय प्रशिक्षण कोर्सेससाठी आमंत्रित केले आहे. या प्रवासादरम्यान त्याने अटलांटा, अलबामा, हंट्सविले, वॉशिंग्टन, फिलाडेल्फिया, न्यूयॉर्क, बोस्टन, न्यू जर्सी तसेच नेदरलँड व पॅरिसला भेट दिली. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, व्हाईट हाऊस, कॅपिटॉल हिल, एअर अँड स्पेस म्युझियम, ग्राउंड झिरो, टाइम्स स्क्वेअर यांसारखी स्थळे त्याने पाहिली.
मीत तांडेल सध्या नॅशनल इंग्लिश स्कूल, मनवेलपाडा (विरार) येथे इयत्ता दहावीत शिकत आहे. लहान वयापासूनच तो नेहरू सायन्स सेंटर, इस्रो मॅजिका यांसारख्या केंद्रांत वैज्ञानिक कोर्स करत आहे. विज्ञान प्रदर्शनात तो नेहमी अव्वल येत आहे. 'इज रॉमॅचिका स्पेस एजन्सी'कडून त्याचा सतत सन्मान होतो आहे; पुण्यात पिंपरी येथे त्याच्या हस्ते दुबई स्पेस कॅम्पच्या ट्रॉफीचे अनावरणही करण्यात आले.
मीतने सातासमुद्रापार जाऊन गावाचे, पालघर जिल्ह्याचे महाराष्ट्राचे आणि भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याचे धाडस, चिकाटी, आणि ज्ञानाची तळमळ प्रेरणादायी आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मीत हा आदर्श व रोल मॉडेल ठरला आहे.