तंबाखूजन्य पदार्थांची विक्री  file photo
पालघर

Palghar News : खोडाळ्यात मागच्या दाराने होतेय तंबाखूजन्य पदार्थांची विक्री

एफडीएच्या कडक कारवाईच्या इशाऱ्याला केराची टोपली

पुढारी वृत्तसेवा

खोडाळा : महाराष्ट्रात गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबवली जात असून, आता अवैध गुटखा विक्रेत्यांवर थेट मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. मात्र, असे असले तरी खोडाळा आणि मोखाडासारख्या महत्त्वाच्या बाजारपेठांसह खेड्या पाड्यावर छुप्या पद्धतीने तंबाखूजन्य आणि पानमसाला विक्री आजही मागच्या दाराने सुरू आहे. इतकेच नव्हे तर अशाप्रकारे अन्य तालुक्यांमध्ये थेट खोडाळा येथून गुटखा पुरवठा केला जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुटखा विक्रीचे लोन प्रत्यक्ष खोडाळा येथून सर्वदूर पोहोचले असल्याच्या चर्चेला गुटखाबंदी मोहिमेमुळे उधाण आले आहे.

पालघर जिल्हा पोलीस विभागाकडून पाच महिन्यात तब्बल 97 लाख 28 हजार 32 रुपयांचा गुटखा जप्त केल्याचे समोर आले असून यामध्ये 47 लाख 40 हजार किमतीची वाहने देखील पकडण्यात यश आले आहे.सन 2026 मधील अवघ्या पाच महिन्यात गुटखा विरोधात तब्बल 15 कारवाया करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. तर सन 2024 मधील मार्च महिन्यात एकट्या खोडाळा येथून तब्बल 5.50 लक्ष रुपयांची तंबाखूजन्य पदार्थ वाहतूक करणारी बोलेरो पिकअपसह तब्बल 25 लक्ष 62 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल तत्कालीन परिस्थितीत पोलिसांनी जप्त केला होता. यावेळी दोघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले होते. मोखाडा तालुक्यातील प्रतिबंधित तंबाखू जन्य पानमसाला जप्त होण्याची त्यावेळची ही सर्वात मोठी कारवाई पोलिसांनी केली होती.या घटनेमुळे मोखाडा तालुका पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आला होता.मात्र त्या नंतरही गुटखा आणि पानमसाला विक्रीला म्हणावा असा पायबंद बसला नाही. त्याशिवाय सन 2023 मध्ये मोखाडा तालुक्यातील एका फार्महाऊसवर एमडी व मॅफेड्रॉन सारखा मोठा साठा मिळून आला होता. एकूणच या प्रकरणामुळे ड्रग्ज साठी मोखाडा सारख्या अतिदुर्गम भागाचा वापर मोठ्या शिताफीने केला गेल्याचे समोर आले होते.

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.त्यामूळे कर्करोगाला विकतचे निमंत्रण देणाऱ्या या घातक पदार्थ विक्रीला मोठ्या प्रमाणावर चाप बसणार आहे. प्रशासनानेही मोहीम अधिक तीव्र केली असली तरी ग्रामीण आणि आदिवासी बहुल निष्कांचन बांधवांचे आरोग्यमान सावरण्यासाठी पोलिस प्रशासनाने ही मोहीम मोखाडा तालुक्यातील ग्रामीण भागात अधिक तीव्रतेने राबवण्याची गरज या धर्तीवर व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT