भात लावणीसाठी भाताचे रोप तयार ठेवलेल्या शेतकऱ्यांचे गणित कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. Pudhari News Network
पालघर

Palghar News : पालघर जिल्ह्यात पावसाच्या दांडीमुळे बळीराजा झाला चिंतांतुर

सरासरीपेक्षा कमी पावसाच्या शक्यतेने लावणीच्या तोंडावर भातशेती अडचणीत

पुढारी वृत्तसेवा

तलासरी (पालघर) : पालघर जिल्ह्यात पावसाने लावणीच्या मोक्याच्या काळात दांडी मारल्याने शेतकरी वर्गात मोठी चिंता पसरली आहे. भारतीय हवामान विभागाच्या विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार १७ ते २४ जुलै दरम्यान जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून, मुसळधार पावसाचा फारसा अंदाज नाही. यामुळे लावणीसाठी भाताचे रोप तयार ठेवलेल्या शेतकऱ्यांचे गणित कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शेतकरी पूर्णपणे नैसर्गिक पावसावर अवलंबून असून, हवामानाच्या या बदलत्या चक्रामुळे त्यांना लावणीसाठी आवश्यक पाणी मिळणार नाही. परिणामी, भात शेतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी लावणी पूर्ण झाली आहे, तिथे भाताचे रोप सुकण्याचा धोका निर्माण झाला आहे.

आम्ही भात रोपे लावण्यासाठी तयार ठेवली आहेत, परंतु पाऊसच नाही. आमच्याकडे विहिरीही नाहीत, पाणी टंचाईमुळे शेतीचा सर्व खर्च वाया जाण्याची भीती आहे. सरकारने काही मदत केली नाही तर आम्ही पूर्णपणे अडचणीत येऊ.
संदीप हरपाले, शेतकरी, पालघर, ठाणे.
पालघरमधील शेतकरी संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. पावसाने पाठ फिरवली तर त्याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहावर बसतो.

हवामान विभागाचा अंदाज

दरम्यान, २४ ते ३१ जुलै दरम्यान जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, तोपर्यंतचा वेळ काढणं शेतकऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरणार आहे. कृषी विभागाचा सल्ला जिल्ह्यात येत्या सात दिवसांत जोरदार पावसाची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका व पुनर्लागवड केलेल्या खाचरांमध्ये पाण्याची कमतरता भासू नये यासाठी योग्य नियोजन करावे. पावसाचे पाणी अडवण्यासाठी बांधांची बांधिस्ती करून पाणी साठवून ठेवावे.

ज्या भागात बाह्य जलस्रोत (नदी, विहीर, तलाव) उपलब्ध आहेत तिथून पाण्याचा वापर करून भात शेतीला पाणी पुरवठा करावा, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. सध्या निर्माण झालेल्या हवामान परिस्थितीमुळे पालघर जिल्ह्यातील भातशेती संकटात सापडली असून, शासनाने या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तसेच पालघरमधील शेतकरी संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. पावसाने पाठ फिरवली तर त्याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहावर बसतो. शासनाने तातडीने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करून शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT