पालघर : ऑनलाइन गेम खेळून पैसे हरल्यामुळे भक्त असूनही देव मदत करत नाही या रागातून उमरोळी येथील मंदिरात अपकृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासून उघड झाला आहे. सागर सुरेश पाटील असे अटक आरोपीचे नाव आहे. पालघरमधील उमरोळीमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
पालघर तालुक्यातील उमरोळी येथे पालघर-बोईसर रोड लगत असलेल्या मंदिरात अपकृत्य घडल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांचा मोठा जमाव मंदिर परिसरात जमा झाला आणि परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. नागरिकांचे समजूत काढत नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय साहित्या २०२३ च्या कलम २९८ अन्वये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व पालघर पोलीसांनी या प्रकरणाचा तपास केला. याप्रकरणातील आरोपीला पालघर पोलिसांनी अटक केली असून सागर सुरेश पाटील (रा. दहिसर गाव, मनोर, तालुका. पालघर) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीची पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी सागर हा भक्त असून नित्यनेमाने देवाची पूजा करत असे. मात्र ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन तो जवळपास पाच लाख रुपये हरला होता.
नेहमी मंदिरात जाऊन देव मदत करत नाही या रागातून आरोपी सागर याने उमरोळी येथे मंदिरात अपकृत्य केले. आरोपी सागर पाटील याला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदरची कारवाई पालघर पोलीस अधिक्षक यतिश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उप विभागीय पोलीस अधिकारी पालघर प्रभा राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोनि. प्रदिप पाटील, सपोनि व्हटकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच पालघर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत पहाड, सपोनि. मल्हार थोरात व पालघर पोलीस स्टेशनचे पथकाने केली आहे.