पालघर: नगरपरिषदेच्या तीन स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीची उत्कंठा निर्माण झाली आहे. नगरपरिषदेत निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्याबळानुसार शिवसेनेच्या वाट्याला दोन तर भाजपकडे एक स्वीकृत नगरसेवक येणार आहे. शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या दोन जागांवर आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुकांकडून ठाणे दरबारी जोरदार लॉबीग केली जात आहे. परंतु पदाचा उपभोग घेतलेल्यांना बाजूला सारून स्वीकृत नगरसेवक पदासाठी नव्या दमाच्या लोकांना संधी देण्याची मागणी केली जात आहे.
शिवसेनेच्या दोन जागांसाठी चार जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यात माजी नगरसेवक रवींद्र उर्फ बंड्या म्हात्रे,ऍड धर्मेंद्र भट, दीपा पामाळे आणि अमेय पाटील यांनी अर्ज केले आहेत. रवींद्र उर्फ बंडया म्हात्रे यांना प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवारी देण्यात आली होती,परंतु अटीतटीच्या लढतीत त्यांचा पराभव झाला. त्यांची व्यवसायिक पार्श्वभूमी वादातीत आहे.
ऍड धर्मेंद्र भट यांना पक्षाने स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली होती.दीड वर्षे त्यांनी स्वीकृत नगरसेवक पदाचा उपभोग घेतला आहे. दीपा पामाळे राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या,सद्य स्थितीत त्यांच्या कडे शिवसेनेच्या महिला शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी पद उपभोगलेल्यांना बाजूला सारून नव्या दमाच्या तरुणांसह महिलांना संधी देण्याची मागणी शिवसेनेच्या गोटातुन केली जात आहे.