पालघर ः पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक दिवसाचा कालावधी शिल्लक असताना महाविकास आघाडी, शिंदे सेना आणि भाजपा कडून उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या बाबतीत रहस्य कायम आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजप, शिंदे सेना आणि महाविकास आघाडीकडून शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.
शिंदे सेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. भाजप उमेदवारांच्या बाबतीत सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. सोमवारी तिन्ही पक्षांचे नगराध्यक्ष आणि उमेदवारांची नावे समोर येणार आहेत. महाविकास आघाडी वगळता भाजप आणि शिंदे सेनेत बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
पालघर नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आणि मनसेची महाविकास आघाडी झाली असुन जागा वाटप जवळपास पूर्ण झाले आहे.नगराध्यक्ष पद आणि पंधरा जागाही ठाकरे गट लढवणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आठ जागा,काँग्रेसला चार,मनसे दोन आणि बहुजन विकास आघाडी एक जागा देण्यात आली आहे.नगराध्यक्ष पदासाठी ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
सोमवारी महाविकास आघाडीकडून शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीकडून जागा वाटप ठरल्यानंतरही काही जागांच्या बाबतीत कुरबुरी सुरु आहेत, काही इच्छुक उमेदवारांना चिन्ह्यांच्या बाबतीत आक्षेप आहेत तर मागितलेल्या जागा मिळत नसल्याने रुसवे फुगवे सुरु आहेत. त्यामुळे काही जागांवर बंडखोरी होण्याची शक्यता आहे. संभावित बंडखोरी आणि नाराजी नाट्यातुन महाविकास आघाडीचे नेते कोणता मार्ग काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपकडून पालघर नगरपरिषदेची निवडणुक स्वबळावर लढण्याची तयारी सुरु आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी गटनेता माजी नगरसेवक कैलास म्हात्रे, प्रशांत पाटील आणि ऍड जयेश आव्हाड यांच्यात चुरस आहे.नगरसेवक पदाच्या तीस उमेदवारांची नावे नक्की झाली आहेत. पक्षाचा एबी फॉर्म सोमवारी अर्ज भरण्याच्या वेळी उपलब्ध करून दिला जाणार असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खासदार डॉ हेमंत सवरा आणि भाजपचे जिल्हा स्तरावरील पदाधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
पालघर नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदे सेनेकडून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत मोठे शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे.नगराध्यक्ष पदासाठी माजी उपनगराध्यक्ष उत्तम घरत आणि केदार काळे यांच्यात चुरस आहे. स्वबळावर निवडणुक लढवण्याची तयारी पूर्ण झाली असून नगरसेवक पदासाठी इच्छुक तीस उमेदवारांची नावे पक्की करण्यात आली आहेत. शिंदे सेनेकडून उमेदवारांना पक्षाच्या एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे.
भाजपच्या माजी नगरसेवकाचा शिंदे सेनेत प्रवेश
पालघर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक अकरा मधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले भाजपचे माजी नगरसेवक शशिकांत किणी यांना भाजप कडून तिकीट मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने शुक्रवारी रात्री शिंदे सेनेचे संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केला.शिंदे सेनेच्या पालघर येथील संपर्क कार्यालयात प्रवेश पार पडला.