Branches Left On Road Palghar
खानिवडे : वीज वाहिन्यांवरील झाडांच्या फांद्यांचा वीज वाहिन्यांना स्पर्श झाल्याने शॉर्टसर्किट होऊन मोठा अनर्थ निर्माण होऊ शकतो म्हणून पावसाळ्यापूर्वी महावितरणाकडून वीज वाहिन्यांना अडसर ठरणार्या झाडांच्या फांद्या छाटल्या जात असून कापलेल्या फांद्या रहदारीच्या रस्त्याच्या कडेला फार मोठ्या प्रमाणावर अस्ताव्यस्तपणे टाकून दिलेल्या आहेत. त्यामुळे रहदारीला फार मोठा अडसर निर्माण होऊन वाहने व पादचार्यांना रस्त्याच्या कडेला जाण्यासाठी जागा शिल्लक नाही.
यामुळे धावत्या वाहनांच्या धक्क्यामुळे मनुष्यहानी सारखी दुर्घटना होण्याचा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने त्वरित या फांद्या उचलणे आवश्यक होते परंतु तसे झालेले दिसत नाही. वादळाच्या तडाख्यात यंदा मे पासून पावसाचा प्रारंभ झाला आहे. आता जून सुरू झाला असून पावसात तोडलेल्या फांद्यांचा पाला कुजण्यास प्रारंभ झाला असुन झाडांचा पाला आणि गटारातील गाळ यांचे पावसाच्या पाण्याने मिश्रण होऊन अनेक ठिकाणी रस्त्यावर पसरले आहे. त्याची दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे पादचार्यांना रस्त्याने चालत जाणे येणे अवघड झाले आहे.
या रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते भाजीपाला फळांची विक्री करत असतात. रस्त्यावरील या घाणीमुळे भाजीपाला फळे अतिशय दूषित झालेला असतात. या घाणीमुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यात वसई विरार परिसरात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून रस्त्यावरील या सर्व कचर्याची व गटाराच्या घाणीची विल्हेवाट त्वरित लावण्याची मागणी युवक काँग्रेस तर्फे महापालिकेला करण्यात आली आहे.