Mokhada Pudhari
पालघर

Palghar School News | मोखाडातील अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

मोखाडा शिक्षण विभागाची चालढकल

पुढारी वृत्तसेवा

Mokhada Palghar Unauthorized Schools

खोडाळा : मोखाडा तालुक्यातील अनधिकृत शाळा बंद करून द्रव्य दंडाची रक्कम वसूल करून संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांना मान्यता प्राप्त शाळेत दाखल करावे तसेच सार्वजनिक ठिकाणी त्या त्या अनधिकृत शाळेचे बोर्ड लावण्यात यावे व ध्वनिक्षेपणाद्वारे बालकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेले आहे.

त्यानुसार मोखाडा तालुक्यात भावनादेवी भगवान सांबरे यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळा अनधिकृत ठरविण्यात आलेल्या असून त्यामध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश देऊ नये, असे आवाहन मोखाडा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने एक जाहीर नोटीस अनधिकृत शाळेच्या इमारतीवर प्रकाशित करून केलेली आहे.

मोखाडा तालुक्यात मौजे ब्राह्मणगाव, खोडाळा व दस्तूर खुद्द मोखाडा या तालुक्याच्या ठिकाणी भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कूल सुरू होते व आहे या तिन्ही शाळा अनधिकृत असल्याने त्या तातडीने बंद करण्यात याव्यात याबाबतचे लेखी आदेश केंद्र समन्वयक शिक्षण विभाग पंचायत समिती मोखाडा यांना दिनांक 19/ 5 /2026 व दिनांक 30/6/2026 रोजी गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत काढण्यात आलेले आहेत.

मात्र, संबंधित केंद्र समन्वयक यांनी त्यावर उशिराने कारवाई करत दर्शनी भागात संबंधित शाळा अनधिकृत असल्याबाबत व आपल्या पाल्यांना प्रवेश देऊ नये याबाबतची सूचना फलकाद्वारे प्रकाशित करण्याची कार्यतत्परता दाखवलेली आहे त्यामुळे एकूणच मोखाडा तालुक्यातील शिक्षण विभाग आदिवासी विद्यार्थ्यांबाबत किती सजग आहे याची प्रचिती येते.

अनधिकृत शाळांबाबत बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 18 मधील पोटनियम पाच मधील तरतुदीनुसार संबंधित शाळांच्या व्यवस्थापनाला एक लाख रुपये इतका दंड व सूचना देऊनही शाळा बंद न केल्यास प्रतिदिवशी दहा हजार रुपये इतका दंड ठोठावण्यात येईल. अशी तरतूद करण्यात आलेली आहे.

दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अनधिकृत शाळांबाबत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार योग्य ती कारवाई होणे आवश्यक आहे यामध्ये जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी जिल्हास्तरावर प्रसिद्ध करणे पालकांना या शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेश न घेण्याबाबत आव्हान करणे व ध्वनी क्षेपणाद्वारे दवंडी देणे इत्यादी प्रकारची कार्यवाही करणे आवश्यक आहे.

मात्र शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन आठवडे उलटून गेले असून मोखाडा पंचायत समितीकडून त्याबाबत कोणत्याही प्रकारे कार्यवाही न झाल्याने शेकडो पालकांनी आपल्या पाल्यांना संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेऊन दिलेला आहे.मोखाडा पंचायत समितीच्या गलथान कारभारामुळे आदिवासी पाल्यांच्या शैक्षणिक अधिकारावर गदा आलेली आहे.

मोखाडा तालुक्यात भावना देवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कूल यांच्यामार्फत मौजे ब्राह्मणगाव ,खोडाळा आणि मोखाडा येथे तीन शाळा अनधिकृतपणे चालविण्यात येत असून त्या तातडीने बंद करण्याबाबत लेखी समज पत्र संबंधित व्यवस्थापनाला दिलेले आहे.
- गीता मसराम, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती मोखाडा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT