पालघर : पालघर जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतल्याने ठिकठिकाणी गुप्त बातमीदारांच्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार कारवाई सुरू केली आहे. कासा पोलिसांच्या पथकाने चारोटी येथे मुंबईच्या एका ड्रग तस्कराला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे 25 लाखांचे एम डी ड्रग्ज सापडले आहे. गुजरात वरून मुंबईला जात असताना गाडी बदलण्यासाठी चारोटीला गाडीतून उतरले होते. त्याच ठिकाणी पोलिस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी पेट्रोलिंग करत असताना व्यक्तीच्या हालचालीच्या संशयाच्या बळावर केलेल्या कारवाईत १२५ ग्रॅम ड्रग्ज सापडले आहे.
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हामध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहीम सूरु असून या अंतर्गत सर्वत्र शोध मोहीम राबविण्यात येत आहे. कासा पो. ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो. नि. अविनाश मांदले व पथक हे पोलिस ठाणे हद्दीत गस्त आणि संशयित व्यक्तीची तपासणी करत असताना अप्सरा हॉटेलच्या समोर चारोटी येथे एक संशयित व्यक्ती बॅग घेवून जात असताना मिळून आला. त्याचा संशय आल्याने दोन पंचाना बोलावून त्याची अंगझडती आणि बॅगची तपासणी केली असता बॅगमध्ये कपड्याच्या आत एक पिशवी मध्ये सफेद कागदामधे सेलो टेपने गुंडाळलेले एक पुडके मिळाले.
त्या व्यक्तीने त्यात काय आहे या बाबत उपयुक्त माहिती न दिल्याने व फक्त अमली पदार्थ आहे असे सांगत असल्याने संशय बळावल्याने लागलीच पो. नि. स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना पत्र देऊन अमली पदार्थ तपासणी किट मागून घेण्यात आले. प्रशिक्षित अंमलदार पो. हवालदार सूर्यवंशी यांच्या कडून २ पंच समक्ष तपासणी केली असता या पुडकेत एमडी हा अमली पदार्थ असल्याची खात्री झाली. त्यानंतर वजन काटा मागवुन वजन केले असता पुडकेसह वजन केले असता सुमारे १२५ ग्रॅम वजन असलेले एमडी किंमत अंदाजे २५ लाख रुपयाचा माल मिळून आला. याबाबत रीतसर पंचनामा करण्यात आला असून राज बाबन शेअल (वय २६ वर्ष) रा. बांद्रा मुंबई याला ताब्यात घेण्यात आले आहे. हा संशयित व्यक्ती अहमदाबादवरुन मुंबई येथे जाताना चारोटी येथे वाहन बदलून जाण्यासाठी उतरला होता. कासा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
पालघर जिल्ह्यात ड्रग विरोधात वेळोवेळी कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी पालघर पोलिसांनी ऑनलाईन पोर्टल वरून किंवा थेट फोन करून कुठे ड्रग्स विक्री अथवा इतर माहिती असल्यास कळवावी. त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. कारवाई नक्की केली जाईल. जिल्ह्यात ड्रग विरोधात कारवाई करण्यात येईल.बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक , पालघर