पालघरच्या नगराध्यक्षपदासाठी आतापासून रस्सीखेच pudhari photo
पालघर

Palghar muncipal election : पालघरच्या नगराध्यक्षपदासाठी आतापासून रस्सीखेच

नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी, उमेदवारी कुणाला याबाबत उत्सुकता

पुढारी वृत्तसेवा

पालघर शहर ः पालघर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येक राजकीय पक्षातून इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षणीय असून निरीक्षक, सुकाणू समिती, तसेच पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे.

पालघर नगरपरिषदेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. उज्ज्वला काळे निवडून आल्या. मात्र नगरपरिषदेत युतीच्या नगरसेवकांचे एकतर्फी वर्चस्व होते. दरम्यानच्या काळात शिवसेनेत पडलेली फुट तसेच माजी नगरसेवकांचे झालेले पक्षांतर यामुळे प्रामुख्याने ही निवडणूक भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) तसेच महाविकास आघाडी मध्ये होईल अशी चिन्ह आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाने आपापल्या परीने मोर्चेबांधणी हाती घेतली आहे.

पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदेगट या दोघांनाही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असून भाजपाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडण्यासाठी खासदार डॉ. हेमंत सवरा तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबाजी काटोळे यांनी काही दिवसांपूर्वी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

भाजपतर्फे नगराध्यक्ष पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून गेल्या महिन्यात पक्षांतर केलेले नगरपरिषदेचे माजी गटनेते कैलास म्हात्रे इच्छुक असून त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, भाजपचे जुने व जेष्ठ नेते जयेश आव्हाड तसेच भाजपा ओबीसी सेलमध्ये सक्रिय असणारे प्रशांत पाटील इच्छुक आहेत. निरीक्षकांनी पाठवलेल्या अहवालानंतर राज्यस्तरावरून नगराध्यक्ष पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान भाजपमध्ये नवे आणि जुने असा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून पालघरचे माजी उपनगराध्यक्ष उत्तम घरात नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख दावेदार आहेत. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते केदार काळे व माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे हे देखील इच्छुक आहेत. यासंदर्भात अंतिम निर्णय पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातून असलम मणियार हे इच्छुक असून राष्ट्रवादी काँग्रेस शहरातील निम्म्या जागांवर उमेदवार उतरवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी आगामी पालघर नगरपरिषदेची निवडणूक एकत्रितपणे लढावणार असून त्याजोडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन विकास आघाडी, जनता दल, भूमी सेना देखील एकत्रित लढणार आहे. महाविकास आघाडीची जागा वाटपासाठी प्राथमिक बोलणी सुरू असून नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून माजी नगरसेवक प्रीतम राऊत इच्छुक असल्याचे कळते.

नगराध्यक्ष पदाचा अंतिम निर्णयमहाविकास आघाडीच्या सुकाणू समितीमार्फत घेण्यात येणार आहे. नगर परषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक असून उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शहरात वातावरण निर्मिती सुरू

इच्छुक उमेदवारांनी समाज माध्यमांवर तसेच शहरात विविध ठिकाणी पोस्टर, बॅनर बाजी करून वातावरण निर्मितीस सुरुवात केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT