पालघर : पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. शिंदे सेनेकडून माजी उपनगराध्यक्ष उत्तम घरत तर भाजप कडून माजी गटनेता कैलास म्हात्रे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीकडून शक्ती प्रदर्शन न करता साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
महाविकास आघाडीतून ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून उमेदवारी मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रीतम राऊत यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप आणि शिंदे सेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मिरवणूका काढण्यात आल्याने शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. शिंदे सेना, भाजप, महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँगेसकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी चौरगी लढत होण्याची शक्यता आहे.
पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या नावांचा सस्पेन्स संपला असून भाजपमधील इच्छुकांच्या स्पर्धेत माजी गटनेता कैलास म्हात्रे यांनी बाजी मारत नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवली. भाजपमधून ॲड. जयेश आव्हाड व प्रशांत पाटील इच्छुक होते. इच्छुकांवर मात करीत ठाकरे गटाकडून भाजप मध्ये आलेल्या कैलास म्हात्रे यांना प्राधान्य देण्यात आले तसेच वीसपेक्षा अधिक नगरसेवक पदाच्या उमेदवारांना तिकीट वाटपात कैलास म्हात्रे यांचा शब्द प्रमाण मानण्यात आल्याने जुन्या भाजपामध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
शिंदे सेनेत माजी उपनगराध्यक्ष उत्तम घरत यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली. माजी नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे यांचे पती केदार काळे शिंदे सेनेतून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून शिंदे सेनेच्या मिरवणुकीला सुरुवात झाली होती. शिंदे सेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, आमदार राजेंद्र गावित, विलास तरे, जिल्हा प्रमुख कुंदन संखे आणि जगदीश धोडी यांच्या उपस्थितीत उत्तम घरत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. भाजपकडून बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने बजरंग दलाच्या इच्छुक पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक होते. भाजपच्या ओबीसी सेलचे प्रशांत पाटील आणि ॲड. जयेश आव्हाड तसेच ठाकरे गटातून भाजपवासी झालेले माजी गटनेता कैलास म्हात्रे इच्छुक होते. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचे आश्वासन देऊन पक्ष प्रवेश देण्यात आल्याने कैलास म्हात्रे यांनाच; परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवशी नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पालघर पंचायत समिती कार्यालयापासून भाजपच्या रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून वाजत गाजत निघालेली रॅली पालघर नगर परिषद कार्यालयाकडे रवाना झाली होती.
दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास नगर परिषद कार्यालय परिसरात दाखल झाली. कैलास म्हात्रे यांनी खासदार डॉ. हेमंत सवरा, बाबाजी काठोळे आणि भाजपचे जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी दीड वाजेपर्यंत भाजपकडून नगरसेवक पदाच्या उमेदवारांना ए बी फॉर्मचे वाटप करण्यात आले नसल्याने गोंधळाची परिस्थिती होती. सरचिटणीस सुशील औसरकर एबी फॉर्म घेऊन दाखल झाल्यानंतर उमेदवारांना फॉर्म वाटप करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपण्याला काही मिनिटे शिल्लक असेपर्यंत भाजपच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटप केले जात होते.
ठाकरे गटाचेही शक्तिप्रदर्शन
महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उपनेते उत्तम पिंपळे यांनी साधेपणाने नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. उत्तम पिंपळे यांच्या सोबत ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कुटुंबीय उपस्थित होते. महाविकास आघाडीत बंडखोरी करत काँग्रेस पक्षातून उमेदवारी मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक प्रीतम राऊत यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून 13 उमेदवारी अर्ज
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून 13 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडणुकीत पालघर शहरात अजित पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपली ताकद दाखवतील, असा विश्वास अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अस्लम मणियार यांनी सांगितले.