मनोर येथील सरपंचांना झालेल्‍या मारहाणीच्या निषेधार्थ मनोर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. Pudhari Photo
पालघर

पालघर : मनोरच्या सरपंचांवर हल्‍ला, निषेधार्थ बाजारपेठ बंद

Palghar News | तणावाच्या पार्श्वभूमीवर मनोर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

पुढारी वृत्तसेवा

पालघर : मनोर ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन पाटील यांना ग्रामपंचायत कार्यालयात धक्काबुक्की आणि मारहाणीचा प्रकार घडल्याने मनोर मध्ये तणावाचे वातावरण आहे. आरोपी आणि सरपंचांच्या झटापटीत वादात मध्यस्ती करणाऱ्या महिला उपसरपंचांना धक्का लागल्याचे बोलले जात आहे. हल्ला प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

दरम्यान सरपंचांच्या समर्थकांनी मनोर पोलीस ठाण्या समोर गर्दी केली असून हल्ल्याच्या निषेधार्थ मनोर बाजार पेठ बंद करण्यात आली आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर मनोर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमूख यांच्या हत्येचे प्रकरण राज्यभरात चर्चेत असताना मनोर ग्रामपंचायतीच्या सरपंचांवर झालेल्या हल्ल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

मनोर ग्रामपंचायत हद्दीतील एका इमारतीमध्ये ग्रामपंचायतीने बिअर शॉप सुरु करण्यासाठी ग्रामसभेचा ना हरकत ठराव राठोड नामक व्यक्तीला दिल्याने आरोपी अल्वी रईस शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात आला होता. ग्रामपंचायतीने ठराव दिलाच कसा? असा प्रश्न उपस्थित करीत कार्यालयात त्यांच्या खुर्चीवर बसलेल्या सरपंचांना जाब विचारत होता. दरम्यान दोघांमधील वाद विकोपाला गेल्याने अल्वी रईस याने सरपंच बसलेल्या आसनाच्या मागे जाऊन कॉलर पकडली, त्यानंतर धक्काबुक्की आणि मारहाण सुरु केली. दोघांमधील वादात मध्यस्ती करणाऱ्या उपसरपंच चंपानेकर यांना फटका बसला आहे.

दरम्यान ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अल्वी रईस याला पकडून ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर काढले. अल्वी अल्ताफ रईस याने सरपंच चेतन पाटील यांना धक्काबुक्की आणि मारहाण केल्या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सरपंच समर्थकांनी मनोर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ मनोर बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर मनोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT