पालघर

विरारमध्ये संतापाचा उद्रेक! लोकल गाडी 'एसी' केल्याने प्रवाशांनी रेल्वे रोखली

Palghar Local Railway | स्थानक परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते

पुढारी वृत्तसेवा

विरार : पश्चिम रेल्वे अंतर्गत विरार रेल्वे स्थानकावर आज सकाळी ८:२८ वाजताची विरार–चर्चगेट लोकल प्रवाशांनी थांबवून जोरदार आंदोलन छेडले. अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांसाठी धावणारी ही गाडी अचानक वातानुकूलित गाडीत रूपांतरित केल्याने संतप्त प्रवाशांनी हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत सेवा काही काळासाठी रोखून धरली. त्यामुळे स्थानक परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी स्थानक प्रशासनाकडून सूचना देण्यात आली होती की, दि. १ मे २०२६ पासून सकाळी ८:२८ वाजताची ही सामान्य लोकल वातानुकूलित स्वरूपात चालवण्यात येईल. मात्र, या बदलामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या नियोजनावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक प्रवासी वर्षानुवर्षे याच वेळेच्या गाडीवर अवलंबून असल्याने अचानक झालेल्या या बदलामुळे त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

विशेष बाब म्हणजे, सकाळी ८:३३ वाजता आधीच एक वातानुकूलित लोकल उपलब्ध असताना, केवळ पाच मिनिटांच्या अंतराने आणखी एक वातानुकूलित गाडी सुरू करण्यात आल्याने सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या गाड्यांची संख्या कमी झाली आहे. परिणामी, इतर सामान्य गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत असून प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रवाशांच्या मते, वातानुकूलित गाड्यांचे भाडे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. कामगार, विद्यार्थी, तसेच निम्न व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना या वाढीव भाड्याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. अनेकांनी सांगितले की, ८:२८ वाजताची सामान्य लोकल ही त्यांच्या रोजच्या प्रवासाची कणा होती, आणि तीच गाडी बदलल्याने त्यांच्या वेळापत्रकात गोंधळ उडाला आहे. आधीच गर्दीने त्रस्त असलेल्या प्रवाशांसाठी हा निर्णय अधिकच त्रासदायक ठरत आहे.

“वातानुकूलित गाड्या वाढवायच्या असतील तर त्या स्वतंत्रपणे वाढवाव्यात; मात्र सामान्य गाड्यांचे रूपांतर करून सर्वसामान्यांवर अन्याय करू नये,” अशी ठाम भूमिका आंदोलक प्रवाशांनी व्यक्त केली. काही प्रवाशांनी प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला.

या आंदोलनामुळे काही काळ विरार स्थानकावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. काही गाड्या उशिराने धावल्या, तर काहींचे वेळापत्रक बिघडले. परिणामी, पुढील स्थानकांवरील प्रवाशांनाही त्याचा फटका बसला.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, प्रवाशांच्या भावना लक्षात घेऊन तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी सर्व स्तरांतून होत आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी पूर्वीप्रमाणेच ही गाडी पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT