Leopard attack Pudhari
पालघर

Palghar Leopard attack | मौजे काष्टी येथील शेतकऱ्याच्या गाभण गायीवर बिबट्याचा हल्ला!

गाभण गायीच्या पोटातील वासरुही दगावले, आदिवासी महिला शेतकऱ्याचे तिहेरी नुकसान

पुढारी वृत्तसेवा

दीपक गायकवाड

खोडाळा : मोखाडा तालुक्यातील मौजे काष्टी येथील चंद्रभागा अर्जुन भोईर या आदिवासी शेतकऱ्याची गाभण गाय शुक्रवार दि 5 रोजी बिबट्याच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडली आहे.अवघ्या 1 ते 2 दिवसांत ही गाय जनली असती असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे. गायी बरोबरच वासरुही दगावले, तसेच गाय व्याली असती तर दूध उत्‍पन मिळाले असते तेही थांबले यामूळे भोईर यांचे तीहेरी नुकसान झाले आहे.त्याचा वस्तूनिष्ठ पंचनामा करून भोईर यांनी योग्य तो मोबदला मिळवून देण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे.

वर्षभरानंतर बिबट्याचा हल्ला

मोखाडा तालुक्यात दरवर्षी बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे जित्राबं दगावत होती.मात्र दरम्यानच्या अवधीत त्यात मोठा खंड पडला होता.आत्ता ही काष्टी येथील घटना वगळता मागील वर्षभरात तालुक्यात सर्वत्र बिबट्याचा वावर थंडावला होता.त्यामूळे वनविभागाचे कर्मचारीही निर्धास्त झाले होते.मात्र काष्टी येथे बिबट्याने धडाकेबाज आगमन करुन गाभण गायीलाच आपले लक्ष बनवल्याने वनविभाग झाडून कामाला लागले आहे.

मागील वर्षी मोखाडा तालुक्यातील वेगवेगळ्या भागात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला होता. याच दरम्यान बिबट्याने दुचाकीस्वारावरही हल्ला केल्याची घटनादेखील घडली होती. त्यातच वेगवगळ्या भागात संध्याकाळ आणि रात्री बिबट्याचे अनेकांना दर्शन घडले आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक भेदरले होते.त्यामूळे बिबट्याची माहिती नागरिकांना व्हावी, म्हणून वन विभागाने वारघडपाडा येथे एआय तंत्रज्ञानावर आधारित सौरऊर्जैवर चालणाऱ्या कॅमेऱ्यासह सायरन बसवला होता.

तसेच वेगवेगळ्या भागात वन कर्मचाऱ्यांची गस्ती पथके निर्माण केली होती.त्याशिवाय नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी ध्वनिक्षेपक,सोशल मीडिया आणि भिंती पत्रकं यांचाही आधार घेऊन व्यापक जनजागृती करण्यात आली होती.तथापी बिबट्याचा वावर थंडावल्याने वनविभागाच्या प्रतिबंधात्मक कार्यवाहीतही कमालीचे शैथिल्य आले आहे.त्याचाच परिपाक म्हणून एका आदिवासी शेतकऱ्याला आपली गाभण गाय गमवावी लागली आहे.

काष्टी येथील बिबट्याच्या हल्ल्यात आमची अवघ्या 2/3 दिवसात जनायला आलेली गाय आम्ही गमावली आहे.त्यामूळे आमचे तीहेरी नुकसान झाले आहे.वनविभाग आणि पशू वैद्यकीय विभाग यांनी वस्तूनिष्ठ पंचनामा करून आम्हाला योग्य ती नुकसानभरपाई तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी भोईर कुटुंबियांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT