खोडाळा: मोखाडा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाने तळ गाठल्याने गावावर पाणीटंचाईचे गंभीर संकट ओढवले आहे. त्यातच नळपाणी पुरवठ्यासाठी कार्यान्वित असलेले जलशुद्धीकरण केंद्रही दीर्घकाळापासून नादुरुस्त असल्याने नागरिकांना गाळमिश्रित व दुर्गंधीयुक्त पाणी प्यावे लागत आहे. परिणामी ग्रामस्थांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाला आहे.
उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. खोडाळा गावासाठी असलेला हा एकमेव पाणी साठवण तलाव असून त्याने तळ गाठल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्याने नळाद्वारे येणारे पाणी अस्वच्छ आहे. हे पाणी पिल्याने नागरिकांना पोटाचे, त्वचेचे तसेच संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढला आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी पर्याय नसल्याने नागरिकांना हेच पाणी वापरावे लागत असून आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने गावात ध्वनिक्षेपकाद्वारे दवंडी देत नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहन केले आहे. तसेच तलावात जनावरे नेणाऱ्या मालकांवर व कपडे धुणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचा इशाराही ग्रामपंचायतीने दिला आहे.