Jalkumbh work incomplete Palghar Pudhari
पालघर

Palghar Water Shortage | खोडाळा परिसरात पाणीटंचाई तीव्र; जलकुंभाचे काम रखडल्याने नागरिक त्रस्त

खोडाळा शहराची वाढती लोकसंख्या आणि विखुरलेली वस्ती यामुळे ग्रामपंचायतीच्या सध्याच्या पाणीपुरवठा योजनेवर मोठा ताण

पुढारी वृत्तसेवा

Jalkumbh work incomplete Palghar

खोडाळा : मोखाडा तालुक्यातील लहान लोकवस्तींच्या पाणीपुरवठ्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने विविध ठिकाणी कमी क्षमतेचे जलकुंभ उभारण्यासाठी आवश्यक उंचीचे सिमेंट काँक्रीटचे स्तंभ उभारले आहेत. मात्र बराच कालावधी उलटूनही या ठिकाणी अद्याप जलकुंभ बसविण्यात आलेले नाहीत. परिणामी परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून संताप व्यक्त केला जात आहे.

खोडाळा शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असून वाढती लोकसंख्या आणि विखुरलेली वस्ती यामुळे ग्रामपंचायतीच्या विद्यमान पाणीपुरवठा योजनेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे काही भागांना चार-चार दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास संपूर्ण नियोजन कोलमडते आणि नागरिकांना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागते.

काही वस्त्यांमध्ये नळयोजना अद्याप पोहोचलेली नसल्याने तेथील नागरिकांना पूर्णपणे विकतच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत ‘जलजीवन मिशन’ योजनेच्या अंमलबजावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या योजनेतील कामांमध्ये होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.

खोडाळा शहराचा विस्तार भैरवनाथ मंदिर परिसरापर्यंत झालेला असून या भागातही लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे या भागात नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा करणे प्रशासनाची जबाबदारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून या भागाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.

येथील जलकुंभ बसवून पाणीपुरवठा तातडीने सुरू न झाल्यास सनदशीर आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

भैरवनाथ मंदिर परिसरात लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जलजीवन मिशनची पाइपलाइन या भागातून पुढे गेली आहे. त्यामुळे या भागालाही तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा आंदोलन करावे लागेल.
— बन्सी गोपाळ हमरे, सामाजिक कार्यकर्ते, खोडाळा
संबंधित ठिकाणी लवकरच जलकुंभ बसविण्यात येईल.
- सुरेश पवार, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT