पालघर शहर ः पालघर शहरातील मुख्य बाजारपेठेतील नाकोडा ज्वेलर्स दुकानात चोरट्यांनी 3 कोटी 72 लाख 35 हजार 460 रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने, 20 लाख रोख असा एकूण 3 कोटी 72 लाख 35 460 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी घरफोडी करून चोरल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अशोका अंबर शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये कार्यरत फरार झालेले दोन सुरक्षारक्षक व इतरांविरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
पालघर शहरातील अशोका अंबर शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील नाकोडा ज्वेलर्स दुकानाचे मालक शनिवारी रात्री दुकान बंद करून आपल्या घरी निघून गेले. शनिवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ज्वेलर्स दुकानाच्या शेजारी असलेल्या दुकानात शटर तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील भिंतीला बोगदा करून ज्वेलर्स दुकानात शिरले.
ज्वेलर्स दुकानातील तिजोरी गॅस कटरने कापून त्यात ठेवलेल्या 92 सोन्याच्या चेन, 31 नेकलेस, 271अंगठ्या, 359 कानातील एअररिंग्स टॉप्स आणि झुमके, 120 कानातील रिंग्स, 92 मंगळसूत्राला लावण्यात येणारे पेंडल, 146 सोन्याच्या चेनचे पेंडल, 19 कानचेन, 118 मंगळसूत्राच्या वाटी, 8 ब्रेसलेट, 12 कानातले लटकन, बारा सोन्याचे कॉइन, 40 किलो चांदीचे दागिने आणि 20 लाख रुपये रोख रक्कम असा एकूण 3 कोटी 72 लाख 35 हजार 460 रुपयांचा ऐवज चोरून चोरटे पसार झाले.
दुसऱ्या दिवशी ज्वेलर्स दुकानाशेजारी असलेले दुकानदार आपले दुकान उघडण्यासाठी आले असताना ज्वेलर्सच्या दुकानाच्या शेजारी असलेले कपड्याच्या दुकानाचे शटर तुटलेल्या अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले व याबाबतची माहिती दुकान मालक व पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करा घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.
पालघर शहरातील मुख्य बाजारपेठेतील भाजी मार्केट येथे असलेल्या अशोका अंबर शॉपिंग कॉम्प्लेक्समधील 60 ते 70 दुकानदारांनी एकत्रितरित्या दिपक सिंग आणि नरेश अशा दोन सुरक्षारक्षकांना दहा हजार रुपये पगारावर कामावर ठेवले होते. दोघेही नेपाळचे रहिवासी असून सहा महिन्यांपासून या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये सुरक्षारक्षक म्हणून ठिकाणी कार्यरत होते. चोरीची घटना घडल्यापासून दोघेही फरार झाले आहेत.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता 5 ते 6 चोरटे ही घरफोडीसाठी आले असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात समोर आले आहे. सुरक्षारक्षक असलेले दिपक सिंग आणि नरेश दोघांनी संगनमत करून अन्य साथीदारांच्या मदतीने ज्वेलर्स दुकानात चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात आरोपी सुरक्षारक्षक दिपक सिंग, नरेश व अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह अन्य चार पथके तयार करून विविध ठिकाणी तपासासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी दिली असून लवकरच चोरट्यांना अटक करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक म्हणाले आहेत.