पालघर

Palghar Jawhar Municipal Council Election: जव्हारमध्ये तिरंगी लढतीमुळे प्रचारसभांचा धडाका

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (शप) मध्ये नगराध्यक्ष पदासाठी तुल्यबळ लढत

पुढारी वृत्तसेवा

पालघर : हनिफ शेख

जव्हार नगरपरिषदेत एकूण नगरसेवक पदासाठी २० जागा आणि एक नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होत आहे. सध्या तरी या निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. जव्हार मध्ये पहिल्यांदाच भाजपकडून स्वबळाचा नारा देत भाजप निवडणूक रिंगणात उतरला आहे. तर अगदी सुरुवातीच्या काळातच राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाची महाविकास आघाडी झाल्याने त्यांच्यामध्ये एकसूत्रता दिसून आली. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांची बोलणी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत सुरू होती यानंतर ही युती झाली. यानुसार सध्या जवाहर नगर परिषदेत भाजप कडून सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढण्यात येत आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने नगराध्यक्ष आणि ११ नगरसेवक पदा साठी ते लढत आहेत तर ठाकरे गटाकडून ९ जागा महाविकास आघाडीच्या बॅनरखाली लढल्या जात आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तब्बल १२ जागेवर आपले उमेदवार उभे केले असून शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पद आणि ८ जागेवर आपले उमेदवार लढवत महायुतीच्या बॅनरखाली ही निवडणूक ती लढत आहेत.

शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा देखील झाली तर अजित पवार गटाचे मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख नरहरी झिरवाळ, आमदार रवींद्र फाटक, अजित पवार गटाचे ठाण्याचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या देखील प्रभाग निहाय चौकसभा झाल्याचे दिसून आले. तसेच शिवसेनेचे उपनेते निलेश सांबरे हे द-

`खील मतदारांच्या थेट दारात पोहोचल्याचे एकूणच चित्र आहे. तर भाजपकडून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची एक प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली तर आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शहरांमध्ये बाईक रॅली सुद्धा झाली. तसेच पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी सुद्धा जाहीर प्रचार सभा जव्हार मध्ये घेतली तर भाजपचे खासदार हेमंत सवरा, विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये हे सुद्धा आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रभाग निहाय मतदारांच्या दारापर्यंत जात आहेत.

या लढतीतला महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाकडून आज राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची जाहीर सभा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आजवर महाविकास आघाडीकडून जाहीर सभा न घेता चौकसभा आणि थेट मतदारांच्या दारात जाऊन मते मागण्याचा प्रयत्न आहे. यासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील भुसारा हाच एकमेव महाविकास आघाडीचा चेहरा जव्हार शहरात फिरताना दिसत आहे. यामुळे जव्हारची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली असून आज तरी तिरंगी लढतीचे चित्र दिसून येत आहे.

आजवर जव्हार शहरावर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे आलटून पालटून सत्ता आल्याचे दिसून येते, मात्र पहिल्यांदाच भाजपने स्वबळाचा नारा देत मोठे आव्हान उभे केले आहे. जव्हार शहरात सर्व जाती-धर्मांच्या मतदारांचं प्रमाण लक्षणीय असलं तरी येथील अल्पसंख्यांक मतावर सर्वच पक्षांचा डोळा आहे. त्यासाठी अनेक उमेदवार आणि पक्ष प्रयत्नशील आहेत. तर जव्हार शहराला लागून असलेल्या प्रभागात आदिवासी मतदान देखील महत्त्वाचे असल्याने त्या ठिकाणी सुद्धा त्या पद्धतीचा प्रचार सर्वच पक्षांकडून करण्यात येत आहे. जव्हार शहरासाठी पाणीपुरवठा होण्यासाठी काम सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना, जव्हारचे स्टेडियम, जव्हार शहरातील रस्ते अशा अनेक योजनांच्या पूर्ततेचे आश्वासन देणारे जाहीरनामे तीनही पक्षांकडून प्रसिद्ध केल्याचे दिसून येते तर काही योजनांचे श्रेय घेण्याची शर्यत देखील या पक्षात लागलेली दिसून येत आहे.

मतदारांच्या घरभेटी घेण्याकडे कल

आज रात्री दहा वाजता जाहीर प्रचार संपत असल्याने यानंतर उमेदवार प्रत्येक मतदाराच्या घरभेटी घेण्याची चिन्हे आहेत. सर्वच पक्ष विकास कामे करण्याच्या अणाभाका घेऊन मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या निवडणुकीत भाजप कडून नगराध्यक्ष पदासाठी पूजा उदावंत, शिवसेना शिंदे गटाकडून पद्मा रजपूत तर महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून रश्मी मणियार हे आपले नशीब आजमावत आहेत. त्यामुळे जव्हारकरांनी कोणाला आपलं नगराध्यक्ष निवडलं हे येत्या दोन तारखेला कळणार हे नक्की.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT