Palghar Conservation Reserve Pudhari
पालघर

Palghar Conservation Reserve: पालघरमधील जव्हार-अशेरीगड-धामणीला संवर्धन राखीव दर्जा; महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची मान्यता

जव्हार, अशेरीगड आणि धामणी परिसराला संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा; वन्यजीवांच्या अधिवास संरक्षणासाठी महत्त्वाचा निर्णय.

पुढारी वृत्तसेवा

पालघर: पालघर जिल्ह्यातील वन्यजीव संरक्षणाला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने जव्हार, अशेरीगड आणि धामणी या तीन परिसरांना संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा दिला आहे. तर तानसा वन्यजीव अभयारण्याच्या विस्ताराचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या 26 व्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जैवविविधतेला चालना देण्यासाठी संवर्धित राखीव क्षेत्रास मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे वन्यजीवांच्या सुरक्षित अधिवासासाठी व हालचालीसाठी हरित कॉरिडॉर तयार होण्याची शक्यता आहे.

राज्यात एकूण १४ नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांची घोषणा करण्यात आली असून त्यात पालघरसह ठाणे, नाशिक, रायगड, नंदुरबार, पुणे आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय राज्यात दोन नवीन वन्यजीव अभयारण्येही घोषित करण्यात आली आहेत.

पर्यावरणप्रेमी व वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते हा निर्णय वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

मात्र स्थानिक शेतकऱ्यांच्या जमीन हक्कांच्या प्रश्नांची दखल घेत प्रशासनाने संवादात्मक पद्धतीने अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एकंदरीतच यामुळे जैवविविधतेला चालना मिळणार असून वन्यजीवांच्या सुरक्षित अधिवासाचा प्रश्न यामुळे मार्गी लागण्याची शक्यता आहे.

ठाणे आणि पालघर विभागातील तानसा वन्यजीव अभयारण्यालगतचा 'नवीन विस्तारित तानसा परिसर' वन्यजीव अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यासही मान्यता देण्यात आली.

तानसा वन्यजीव अभयारण्य मुक्त (मानवी हस्तक्षेपापासून मुक्त) करण्याच्या उद्देशाने, या विस्तारित अभयारण्यात मौजे ओगडा, खोडदे, तिरमाळ, पाचघर, फणसाड आणि आमले या 6 गावांची 588.767 हेक्टर महसूल आणि खाजगी जमीन समाविष्ट करण्याच्या प्रस्तावालाही मंडळाने मान्यता दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT