पालघर : बाबासाहेब गुंजाळ
पालघर येथील रिलीफ हॉस्पिटल राडा प्रकरणातील २२ आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर, आज (दि. १८) त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणातील आरोपी क्रमांक २ ते २३ यांची न्यायालयाने १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तसेच पोलीस तपासाचा भाग म्हणून आरोपींची ओळखपरेड घेण्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे.
डहाणू विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांनी १८ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपींना पालघर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुजाता आर. बांदल यांच्यासमोर हजर केले. पुढील तपासासाठी आणि वाहनांच्या जप्तीसाठी पोलिसांनी दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, आरोपींच्या वकिलांनी पोलीस कोठडीला तीव्र विरोध दर्शवला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी आणि ओळखपरेडसाठी प्रत्यक्ष पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, तसेच पोलिसांना तपासासाठी पुरेशी संधी देण्यात आली आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर पोलिसांची मागणी फेटाळून लावत सर्व आरोपींची १ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
या प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार — डॉ. लिजीमोल कॉपनाल राजू (वय ३७), यश कैलास घुडे (वय २१), रिना चेतन जाधव (वय ४५) आणि सौ. विजया विकास चापके यांच्यासमोर आरोपींची ओळखपरेड घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले होते.
मात्र, आरोपींची ओळखपरेड घेण्याच्या यादीतून पोलिसांनी चक्क मूळ फिर्यादी विवेक झिंगा यांचे नावच वगळले आहे. कोर्टात सादर केलेल्या अर्जात त्यांचे नाव समाविष्ट नाही. आधीच या प्रकरणातील एक साक्षीदार परिचारिका काम सोडून अचानक बेपत्ता झाली आहे, तर दुसऱ्या परिचारिकेनेही काम सोडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस हे प्रकरण कमकुवत तर करत नाहीत ना? असा सवाल उपस्थित होत आहे.
या प्रकरणात मदन विष्णू जाधव, कुंदन बाळकृष्ण संखे, मनीष उर्फ विकी मधुकर संखे, साईराज कल्पक पाटील, राहुल विजय संखे, मनोज चिंतामण घरत, नीलमकुमार मनोहर संखे, शुभम राजेंद्र बादिवडेकर, वृषभ मंगेश वारे, साहिल वीरेंद्र राऊत, मयूर संदेश जाधव आणि रोहित राजेंद्र गावित यांच्यासह अन्य आरोपींचा समावेश आहे.
पोलीस यंत्रणेच्या अर्जाची दखल घेत न्यायदंडाधिकाऱ्यांनी पालघरच्या तहसीलदारांना नियमानुसार ओळखपरेडची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
आमदारपुत्र रोहित गावित यांच्या वतीने पालघर सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्या अर्जात रोहित गावित हे वकिली व्यवसाय करत असल्याचा दावा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता आमदारपुत्र वकील कधी झाले? ते कोणत्या न्यायालयात वकिली करतात? याचा शोध घ्यावा लागेल; किंवा त्यांच्या वकिलांकडून घाईघाईत हा अर्ज करताना काही चूक झाली आहे का? हेदेखील पाहावे लागेल. इतर आरोपींच्या वकिलांकडून जामिनासाठी अर्ज कधी करायचा, तसेच २८ तारखेला सर्वोच्च न्यायालय काय निर्णय अथवा भूमिका घेते हे पाहून पाऊल उचलायचे का, याबाबत आरोपींच्या वकिलांमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे.
काल उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान पालघर प्रकरणात केस डायरी व प्राथमिक तपास करताना पोलिसांनी अक्षम्य चुका केल्याचे ताशेरे ओढण्यात आले. पहिल्या तपास अधिकाऱ्याला पोलीस अधीक्षकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'केवळ वेतनवाढ रोखून तुम्ही अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार का?' असा थेट सवाल पोलीस महासंचालकांना विचारण्यात आला आहे. त्यामुळे आता पालघर पोलीस ठाण्याचे प्रभारी मानभाव आणि सपोनि मल्हार थोरात यांच्यावर काय कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.