पालघर : पालघर जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असून उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. उद्या म्हणजे शनिवारी (दि.२५) पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. तसा आदेश काढला असून अतिवृष्टीमध्ये नागरिकांनी बाहेर पडू नये व सतर्क रहावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
आज दुपारपासून तानसा, मोडकसागर आणि मध्य वैतरणा धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता तानसा धरणाचे एकूण २० दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून सकाळी ११ वाजता २२,१०० क्युसेक आणि दुपारी ३ वाजेपर्यंत २३,२१०.४६ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत येथे ७३.०० मिलिमीटर पावसाची नोंद धरण क्षेत्रात झाली. मोडकसागर धरणातून १४,१७८ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. याच कालावधीत ६५.०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मध्य वैतरणा धरणातून २०१३ क्युसेक पाणी विसर्ग होत आहे. येथे ४८.०० मिलिमीटर पाऊस झाला.
जिल्हा कृषी हवामान केंद्राने शेतकऱ्यांना उद्याच्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे भात पुनर्रलागवड पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भात व नागली रोपवाटिकेतून पाण्याचा योग्य निचरा होण्याची व्यवस्था करावी. नवीन लावलेली फळझाडे वादळी वाऱ्याने कोलमडून पडू नयेत, यासाठी त्यांना काठीचा आधार देण्यास सांगितले आहे. जुन्या आणि नवीन फळबागेतून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी आणि औषध फवारणी व खते देण्याची कामे टाळावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, २६ जुलै रोजी अंगणवाड्या, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना सुट्टी असेल. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असे निर्देश देण्यात आले आहेत.